ठाणे : शेअरिंग रिक्षामध्ये चौथ्या प्रवाशाची बेकायदा वाहतुक करणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतुक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कारवाईचे कारण पुढे करत शेअरिंग रिक्षा चालकांनी गेल्या काही दिवसापासून वाढीव पाच रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. ठाणे स्थानक ते तीन हात नाका या अवघ्या पाच ते सात मिनीटांच्या अंतरासाठी यापुर्वी दहा रुपये भाडे घेतले जात होते. परंतु आता १५ रुपये रिक्षा भाडे घेण्यात येत आहे. शहरात इतर ठिकाणीही अशीच अघोषित भाडेवाढ झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठाणे शहरात काॅल सेंटर, आयटी कंपन्या तसेच लघु उद्योजकांची कार्यालये आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील अनेक नोकरदार ठाण्यात कामानिमित्ताने येत असतात. तसेच ठाणे शहरातील अनेक नागरिक मुंबई, नवी मुंबई शहरातील कंपन्यांमध्ये काम करतात. हे सर्वच नागरिक मीटर रिक्षाचे भाडे परवडत नसल्यामुळे अनेकजण शेअरिंग रिक्षाने प्रवासाचा मार्ग पत्करतात. गावदेवी मंदीर, सिडको बसगाडी थांबा परिसरातून प्रवाशांना शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असल्याने प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या रिक्षा थांब्यावर गर्दी असते. सर्वाधिक गर्दी वागळे इस्टेट, तीन हात नाका, नितीन कंपनी या भागात प्रवास करणाऱ्या थांब्यांवर असते. तसेच, वागळे इस्टेट भागासह ठाण्याच्या इतर भागातून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. ठाणे शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांना आवर घालण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी चार प्रवाशांची बेकायदा वाहतूक करीत असलेल्या शेअरिंग रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. परंतु याचाच गैरफायदा घेत ठाण्यातील शेअरिंग रिक्षा चालकांनी पाच ते दहा रुपयांची अघोषित रिक्षाभाडे वाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे स्थानकालगतचे गावदेवी मंदिर ते तीन हात नाका या अंतरासाठी रिक्षा चालक प्रत्येक प्रवाशाकडून १५ रुपये आकारत आहेत. हे भाडे पूर्वी १० रुपये होते. तर वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १६, २२ येथे जाण्यासाठी पूर्वी २० रुपये आकरले जात होते. मागील महिन्यापासून २५ रुपये भाडे आकारण्यास सुरुवात झाली होती. परंतु मागील काही दिवसांपासून हे रिक्षाभाडे ३० रुपये करण्यात आले आहे. सिडको येथून बाळकूम भागात जाण्यासाठी पूर्वी २५ रुपये रिक्षाभाडे घेतले जात होते. हे भाडे आता ३० रुपये करण्यात आले आहे. तर सिडको ते भिवंडीतील कशेळी-काल्हेर भागात पूर्वी ३० रुपये इतके भाडे होते. त्यात आता १० रुपयांची वाढ करून ४० रुपये घेतले जात आहे. वाहतुक कोंडी असल्यास चालक ५० रुपये आकारतात.

गेल्या काही दिवसांपासून शेअरिंग रिक्षा चालकांनी अचानक भाडेवाढ केली आहे. त्याचा परिणाम आमच्यासारख्या नोकरदारांना सहन करावा लागत आहे. वागळे इस्टेट येथे जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच २० रुपयांचे २५ रुपये भाडे करण्यात आले होते. आता २५ रुपयांनतर ३० रुपये भाडे झाले आहे. – दिपाली घाटपारडे, प्रवासी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा चालकांनी अशी भाडेवाढ केली असल्यास ती बेकायदा आहे. प्रवाशांनी याबाबत तक्रार केल्यास अशा रिक्षा चालकांवर कारवाई केली जाईल. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.