उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आता शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यात शहरातील प्रभावी गट असलेल्या टीम ओमी कलानी यांच्यासोबत युती जाहीर केल्यानंतर शिवसेनेने गुरूवारी साई सेनेची घोषणा केली. सेक्युलर अलायन्स ऑफ इंजिया अर्थात साई पक्ष हा शहरातील काही विभागात प्रभाव असलेला मोठा गट आहे. या गटाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी गुरूवारी साई पक्ष आणि शिवसेनेची साई सेना अशी युती झाल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.

उल्हासनगर शहरातील महापालिका निवडणुकीतील राजकारण हे प्रत्येक निवडणुकीला वेगळे असते. २०१७ वर्षात झालेल्या शेवटच्या महापालिका निवडणुकीत आज महायुतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपने एकमेकांविरूद्ध लढवली होती. त्यात टीम ओमी कलानी या प्रभावी गटाने भाजपच्या चिन्हावर आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामुळे भाजपला मोठी उभारी मिळाली होती. तर याच निवडणुकीत साई पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती.

मात्र निकालानंतर त्यांनीही सत्ता स्थापनेच्या वाटेवर असलेल्या भाजपला मदत केली होती. तर पारंपरिक सहकारी असलेल्या शिवसेनेला भाजपाने विरोधात बसवले होते. त्यानंतर काही दिवसातच महापौरपदाच्या आश्वासनावरून टीम ओमी कलानीने भाजपाशी काडीमोड घेतली. महापौरपदाच्या निवडीत भाजपचेच मात्र कलानी गटाच्या नगरसेवकांनी विरोधात मतदान करून शिवसेनेला मदत केली. त्यामुळे शिवसेनेच्या लीलाबाई आशान महापौर बनल्या होत्या. त्यानंतर उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली.

शिवसेना भाजप राज्यात पुन्हा एकत्र आले. त्यानंतर लोकसभेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, तर आमदार म्हणून भाजपचे कुमार आयलानी निवडून आले. मात्र आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी अनेक तडजोडी सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी टीम ओमी कलानीसोबत दोस्ती का गठबंधन असल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनेने कलानी गट महायुतीत आल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपाची मात्र कोंडी झाली. त्याला काही दिवस उलटत नाहीत तेच गुरूवारी शहरातील प्रभावी गट असलेल्या साई पक्षाने आपण येत्या पालिका निवडणुकीत शिवसेना पक्षासोबत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या युतीला साई पक्षाने साई सेना असे नाव दिले आहे. या घोषणेवेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे आमदार, साई पक्ष प्रमुख जीवन इदनानी आणि टीओके प्रमुख ओमी कालानी उपस्थित होते. या प्रसंगी तिन्ही घटक पक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या युतीचे स्वागत केले.