ठाणे : स्व. अनंत तरे यांना उपनेतेपद मिळाले, हे बाळासाहेब ठाकरेंच्या आणि दिवंगत दिघे साहेबांच्या विश्वास आणि मार्गदर्शनामुळेच शक्य झाले. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या उपस्थितीत अनंत तरे यांचे नाव सुचवण्यात आले होते आणि ही शिफारस स्वतः दिवंगत दिघे साहेबांनी केली होती. या घटनेमुळे हे नाते ठाण्यातील राजकारणात मानाचे प्रतीक मानले जात होते, परंतु सध्या त्यात विष टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी स्व. अनंत तरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या बाबत उबाठाचे संजय तरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, “आनंद दिघे जिल्हाप्रमुख असताना अनंत तरे यांना उपनेते करून त्यांचा छळ करण्यात आला. दिघे साहेबांना मानसिक त्रास देण्यामागे संजय राऊत यांचा डाव होता.” या वक्तव्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली. कारण आनंद दिघे आणि अनंत तरे हे दोघेही ठाण्याच्या राजकारणात अतिशय आदराने घेतले जाणारे नावं आहेत.

प्रवक्ते गाढवे म्हणाले, ” बाळासाहेब आणि धर्मवीर दिघे यांचे योगदान महाराष्ट्राच्या राजकारणात अमूल्य आहे. त्यांच्या नावाचा वापर करून राजकारणात चिखल फेकणे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. दिवंगत नेत्यांचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.”

विशेषतः आगरी-कोळी समाजाने हा विषय लक्षात घेत समाजाच्या नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. गाढवे यांचा असा सवाल आहे की, नेमकी नाराजी कुणाबद्दल आहे आणि दिवंगत नेत्यांचे नाव वादात का ओढले जात आहे. राजकारण बाजूला ठेवून तरी या नात्याचा, विश्वासाचा आणि पारंपरिक संस्कारांचा सन्मान करणे अत्यावश्यक आहे.

शिवसेना गटाचे गाढवे यांचे मत आहे की, या प्रकारे वाद निर्माण करणे, दिवंगत नेत्यांना बदनाम करणे आणि त्यांच्या योगदानाचा अपमान करणे हे ठाण्याच्या परंपरेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या विधाननंतर शिंदे गट आक्रमक झाला असून त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सुरु केले. शुक्रवारी ठाणे लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यावेळी मस्के यांनी स्व. अनंत तरे यांच्या बद्दल वक्तव्य केले.