डोंबिवली – उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी रविवारी (ता.२३) आपल्या शहरप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. शहरप्रमुख पदी आल्यापासून अभिजीत सावंत यांनी डोंबिवलीतील नागरी समस्या, विकासाच्या विषयावर आंदोलने केली होती. त्यांच्या अचानकच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

अभिजीत सावंत यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की डोंंबिवली शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या पक्षविरोधी कारवायांचा निषेध म्हणून मी शहरप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्षफुटीनंतर आपल्या जवळच्या सुमारे पंधरा पदाधिकाऱ्यांना अपमानित केले. त्यांना नंतर पदावरून दूर केले. या रिक्त झालेल्या पदांवर जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेशी संबंधित १३ व्यक्तिंना मानाच्या पदावर नेमले. त्यामुळे म्हात्रे यांनी आपली पक्ष संघटना वाळवीप्रमाणे पोखरायला सुरूवात केली आहे. आताही नियमितपणे उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांचा अपमान केला जात आहे.

आमच्या शिवाय कोणीच डोंबिवलीत नाही असा संदेश आपल्या कृतीमधून दिला जात आहे. आम्ही श्रेष्ठ, संघटना दुय्यम अशी कृती जिल्हाप्रमुख म्हात्रे, संघटक माने यांच्याकडून केली जात आहे. या पापात मी सहभागी होऊ इच्छित नाही. त्यामुळे पदाचा राजीनामा देणे मी पसंत करत आहे, असे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक काळात सामान्य शिवसैनिकांनी जीवाचे रान करून पक्षाला कल्याण लोकसभा मतदारसंघात चार लाखाच्या आसपास मते मिळवून दिली. ती आपल्या विरोधी पक्षांच्या डोळ्यात खुपत आहेत. पुढील निवडणुकीत आपला पक्ष विस्कळीत झाला पाहिजे अशा पध्दतीने या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत शहरप्रमुख म्हणून आपण दिलेली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडली. पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण आता संघटनेत काम करणे अशक्य झाल्याने मी पदापासून दूर होत आहे. सामान्य निष्ठावान शिवसैनिक म्हणून मी सक्रिय राहीन, असा विश्वास सावंत यांनी पक्षप्रमुखांना दिला आहे.

शहरप्रमुख अभिजीत सावंत हे एकदा शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांच्या पक्ष कार्यालयात बसले असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी ते का होते हे समजले नाही. पण यासंदर्भातची लेखी माहिती आपण पक्ष समन्वयक गुरूनाथ खोत यांना दिली आणि अभिजीत सावंत यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. आपल्याला पदावरून दूर करणार असल्याची कुणकुण लागली असल्याने सावंत यांनी राजीनाम्याचे नाटक केले आहे. जिल्हाप्रमुख म्हणून आपण शहरप्रमुखाला नेहमीच मानाने वागविले. त्यांचा कधीही उपमर्द केला नाही. – दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट डोंबिवली.