अल्पवयीन मुलीवर आईकडूनच जबरदस्ती
वसईत उघडकीस आलेल्या ‘सेक्स रॅकेट’मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील एक महाविद्यालयीन तरुणी सिनेदिग्दर्शकाची मुलगी असून तिचे पुढील महिन्यात लग्न होणार आहे, तर अन्य एका अल्पवयीन मुलीला तिचीच आई वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याचे उघड झाले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नुकतीच वसईच्या उच्चभ्रू वसाहतीत चालणारा वेश्या व्यवसाय उघडकीस आणला होता. या वेळी पोलिसांनी तीन मुलींची सुटका करून एका महिलेसह दोघांना अटक केली. त्यांच्या तपासासून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व मुली चांगल्या घरातील होत्या. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिची आईच तिला वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. तिच्या आईलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात १९ वर्षांच्या तरुणीचा वेश्याव्यवसायात सहभाग आढळून आला आहे. ती मीरा रोड येथे राहणारी असून बॉलीवूडमधील सिनेदिग्दर्शकाची मुलगी आहे. विशेष म्हणजे तिचा साखरपुडा झाला असून पुढील महिन्यात तिचे लग्न असल्याची माहिती पोलिसांनी दिली.