रहिवाशांची तीव्र नाराजी; पालिकेचे आश्वासन फोल
ठाणे : ठाणे शहरातील निसर्गरम्य असलेल्या येऊर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलावाजवळ वाराणसी घाटाच्या धर्तीवर कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या दशक्रिया विधी घाटाला स्थानिक रहिवाशांकडून विरोध झाला होता. या विरोधानंतर या घाटावर श्राद्ध तसेच दशक्रिया विधी होणार नसल्याचे आश्वासन महापालिकेने नागरिकांना दिले होते. मात्र या घाटावर आता दशक्रिया विधी, मुंडण करणे, पाण्यात विधीचे साहित्य सोडणे असे प्रकार सुरू आहेत.
ठाणे शहरातील निसर्गरम्य असलेल्या येऊर डोंगराच्या पायथ्याशी उपवन तलाव असून त्या ठिकाणीही विविध प्रकल्प राबवून तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यात आली आहे. मात्र या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तलावाजवळील पाणथळ क्षेत्राचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात होती. असे असतानाच आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीनंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार वर्षांपूर्वी उपवन तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला कोणत्याही प्रकारे बाधा न आणता वाराणसीतील बनारस घाटाच्या धर्तीवर विसर्जन घाट आणि अॅम्पी थिएटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तलावाकाठी बुरुज आणि दशक्रिया घाट तसेच तलावात तरंगता रंगमंच उभारण्यासाठी तब्बल २२ कोटी २९ लाख रुपये खर्चाची मंजुरी दिली होती. त्यानंतर या कामाला स्थगिती मिळाली होती. मात्र पुन्हा या कामाची महापालिकेकडून निविदा मागवण्यात आली. यापैकी अॅम्पी थिएटरचे बांधकाम झाले असून घाटाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. २ कोटी रुपयांहून अधिक खर्च वाराणसी घाटासाठी होत आहे. हे बांधकाम पूर्ण होत नाही तोच आता या ठिकाणी नागरिकांकडून पाणी आणि कचरा प्रदूषण करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
या परिसरात तलावाच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले वसलेली असून येथील रहिवाशांनी या घाटाच्या बांधकामास विरोध केला होता. या घाटावर श्राद्ध तसेच दशक्रिया विधी होण्याची भीती व्यक्त केली होती. दरम्यान, वाराणसी घाटाच्या धर्तीवर हा घाट बांधण्यात येणार असला तरी त्या ठिकाणी श्राद्ध विधीचे कार्यक्रम होणार नाहीत, असे आश्वासन महापालिकेने नागरिकांना दिले होते. मात्र या घाटावर आता दशक्रिया विधी, मुंडण करणे, पाण्यात विधीचे साहित्य सोडणे असे प्रकार सुरू झाल्याने महापालिकेचे आश्वासन फोल ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
श्राद्ध विधीमुळे प्रदूषण
ठाणे शहराची चौपाटी असणाऱ्या उपवन तलावाच्या किनाऱ्यावरील खडक नष्ट करून त्या ठिकाणी बनारस घाटाची निर्मिती केली जात असून त्यामुळे या भागातील गवत, पक्षी आणि कीटक तसेच जलचरांचे अधिवास धोक्यात आले असल्याच दावा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. मात्र आता घाटावर होणाऱ्या श्राद्ध विधीमुळे पाणी आणि कचरा प्रदूषणही होत आहे. नागरिक मुंडन केल्यानंतर तसेच विधी केल्यानंतर कचरा येथील पाण्यात टाकत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
उपवन येथे तयार करण्यात येणारा घाट हा वाराणसीप्रमाणे असला तरी हा घाट दशक्रियेसाठी नाही, ही बाब नागरिकांनी लक्षात घ्यायला हवी. या ठिकाणी दशक्रिया विधी होत असतील तर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास महापालिकेच्या संबंधित विभागाला सांगण्यात येईल.
– हणमंत येमेलवाड, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका, वर्तकनगर प्रभाग समिती