ठाणे : आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी सुरु असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या “आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे” आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरुच होते. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले. गुरुवारी सकाळी ठाणे, पालघर जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने कातकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करून आदिवासी व कातकरी समाजाच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करावी नाही तर, हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरु आहे. दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे कातकरी खुलेआम उध्वस्ततेच्या मार्गावर उभा असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ `आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ आंदोलन पुकारले होते. श्रमजीवीचे हजारो आदिवासी महिला, पुरुषांसह तरुण मुल मुली या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार रोजी दिवसभर मौन पाळून उपोषण करण्यात आले होते. तर, सायंकाळी ६.१५ वाजता “आदिवासी बचाव – कातकरी बचाव” या संकल्पनेने आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबविण्यात आले. त्याचदरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गाव-पाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर तसेच अंगणात दिवे लावून “अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प” केला. संघटनेच्या गाव-पाड्यातील आत्मक्लेश उपोषण बुधवारी पार पडले. तर, गुरुवारी सुमारे ५० हजार श्रमजीवीचे सभासदांनी आदिवासी बचाव, कातकरी बचाव या निर्धाराने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मौन भूमिका कायम राखली.
संघटनेचे म्हणणे…
कातकरी समाज आजही निरक्षरता, गरिबी, कर्जबाजारीपणा आणि स्थलांतराच्या चक्रात अडकलेला आहे. अल्पवयीन मुलींच्या अमानुष व्यापाराचे वाढते प्रमाण, पुनरुज्जीवित झालेली वेठबिगारी, बालमृत्यूंच्या घटना, अपूर्ण जल-जीवन योजना, अर्धवट शिक्षण आणि वनहक्क तसेच गावठाण हक्कांची प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. हा लढा केवळ आंदोलन नसून आदिवासी कातकरींच्या “माणूस म्हणून जगण्याचा हक्क” मिळविण्याचा आत्मनिर्धाराचा संकल्प आहे, असे रामभाऊ वारणा यांनी सांगितले.
