काहींनी फलक लावले तर, काहींचे मात्र आस्ते कदम

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्या संपर्क साधला जात असला तरी जिल्ह्यातील शिवसेनेत फुट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवरून शिंदे समर्थक असल्याचे संदेश दिले आहेत. तर, काहींनी शहरात तशाप्रकारचे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे, शिंदे यांच्याविरोधात प्रतिक्रीया उमटताना दिसून येत नाही. तसेच शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक गोंधळून गेले असून शिवसेनेसोबत की शिंदे यांच्यासोबत राहयचे, अशी त्यांची दुहेरी मनस्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आस्ते कदम ची भुमिका घेत मौन धारण केल्याचे दिसून येत आहेत.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यात शिवसेनेची पायामुळे घट्ट रोवली. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हयाची सुत्रे आली. त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविली आणि त्याचबरोबर शिवसैनिकांशी नाळ जोडली. विशेष म्हणजे, मुंबईमध्ये शिवसैनिकांकडून शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने केली जात असली तरी ठाणे जिल्ह्यात मात्र शिवसैनिकांकडून कोणतीही प्रतिक्रीया उमटलेली नाही. यातूनच जिल्ह्यातील शिवसेनेत फुट पडणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्या संपर्क साधला जात असला तरी त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश येताना दिसत नाही. शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकाऱ्यांनी उघडपणे शिंदे समर्थक असल्याचे समाजमाध्यांवरून संदेश देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे येथील कळवा भागात माजी महापौर गणेश साळवी यांनी आम्ही शिंदे समर्थक असल्याचे फलक लावले आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गुवाहाटी येथे आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर या बालेकिल्ल्याला अभेद्य राखणाऱ्या शिंदे यांनीच बंडाचे निशाण फडकविल्याने काही शिवसैनिक गोंधळून गेले आहेत.

एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडणार की काय अशी शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांच्या मागे उघडपणे उभे राहायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा द्यायचा याबाबत  उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांच्यात संभ्रम आहे. खासगीत बोलताना बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदे यांनाच पाठींबा देणार असल्याचे सांगत असले तरी सध्या उघडपणे कुणी समोर येऊन भूमिका मांडताना दिसत नाहीत. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण, शहापूर या भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी या भागात मोठया प्रमाणात विकासकामांना निधी दिला. त्यामुळे त्यांच्या आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागे मोठा जनाधार आहे.  मात्र आणखी काही दिवस चित्र स्पष्ट होण्याची वाट पदाधिकारी पाहत आहेत. अनेकांनी समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांचे फोटो ठेवत अप्रत्यक्ष पाठींबा जाहीर केला आहे. तर अनेकांनी जाहीर फेसबुक पोस्ट लिहून आपला पाठींबा व्यक्त केला आहे.

कल्याणमध्येही फुटीची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण, डोंबिवली तसेच २७ गाव परिसरातील शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ते पदाधिकारी यांना नावाने ओळखणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षात अनेक कार्यकर्त्यांना पक्षातील मानाची पदे, स्वप्नात नसलेल्या पदाधिकाऱ्याला महापौर, आमदारकीची उमेदवारी देऊन पक्षासह शहर, कार्यकर्त्याला मोठे करण्याचा प्रयत्न केला. याची जाणीव असलेला या भागातील शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता गेल्या दोन दिवसांपासून शिंदे यांच्या बंडाळीमुळे शांत असून, हा निष्ठावान शिवसैनिक शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची माहिती शिवसेनेतील जुन्या जाणत्यांनी दिली. मुंबईतील शिवसेनेच्या एका प्रवक्त्याच्या समर्थक, प्रवक्त्याचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा डोंबिवलीतील एक पदाधिकारी सोडला तर डोंबिवली, कल्याणमधील बहुतांशी सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे यांच्या सोबत असतील, असे या ज्येष्ठ शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला या भागातील शिवसैनिक नंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने निष्ठेने अनेक वर्ष काम करत आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे अगदी जवळचे आहेत. त्यामुळे हा कट्टर शिवसैनिक शिंदे यांच्या साथीने नव्या शिवसेनेला साथ देईल. शिवसेनाप्रमुखांना मानणारा शिवसेनेतील कल्याण डोंबिवली भागातील एका मोठा वर्ग पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याने प्रत्येकाच्या मनाला एक टोचणी आहेच, असेही शिवसैनिकांनी सांगितले.