लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील गावदेवीच्या मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका शुक्रवारी दुपारी दोन चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. या मंदिरात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे.

कचोरे गावातील एक ग्रामस्थ मंदिरात शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दिवाबत्ती करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना गावदेवी मंदिरातील देवीच्या पादुका गायब असल्याचे दिसले. त्यांनी मंदिर परिसरात शोध घेतला त्यांना परिसरात भुरटे चोर किंवा पादुका आढळल्या नाहीत. या ग्रामस्थाने कचोरे गावात जाऊन गावेदवी मंदिरातील पादुका चोरीला गेल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ तात्काळ मंदिरात जमा झाले. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी तपासले. त्यावेळी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन भुरटे चोर मंदिर परिसरात आले. एक जण पहिले मंदिरात आला. त्याने देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बाहेर उभा असलेला एक भुरटा चोर आत आला. दोघांनी देवीची पूजा केली. नमस्कार करून मंदिर परिसरात कोणी दिसत नाही पाहून मंदिरातील देवी समोरील चांदीचा पादुका काढून त्या घेऊन पळून गेले. तीस हजार रुपये किमतीच्या या चांदीच्या पादुका आहेत. या चोरीप्रकरणी ग्रामस्थांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आणखी वाचा- बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळीने साडेपाच कोटी रुपये लुटले, १२ जण अटकेत

गेल्या वर्षी कचोरे गाव मंदिरात दानपेटीची चोरी करण्यात आली होती. गावाच्या एका बाजुला आणि वर्दळीच्या ठिकाणी गावदेवी मंदिर आहे. ९० फुटी रस्ता, चोळे पाॅवर हाऊस भागात खाडी किनारा गर्द झाडी असल्याने या भागात गर्दुल्ले, मद्यपी, भुरटे चोर या भागात तळ ठोकून असतात. रात्रीच्या वेळेत ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून बाहेर पडून ९० फुटी रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांना या गर्दुल्ल्यांचा त्रास सहन करावा लागतो. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरातील पाच ते सहा मंदिरांमध्ये भुरट्या चोरांनी चोऱ्या केल्या आहेत.