शहापूर : मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक चंद्रकांत गवारे याने त्याच्या साथिदारांसह मुंबई नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या एका टेम्पोमधील पाच कोटी ४० लाख रुपये लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी चंद्रकांत गवारे याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेली ५० टक्के रक्कम जप्त केली आहे. त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही रोकड जळगाव येथील सराफा व्यापाऱ्याची असून मुंबईमधील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी ही रोकड नेली जात होती असे पोलिसांनी सांगितले. परंतु निवडणुकीपूर्वी इतकी मोठी रोकड टेम्पोतून नेली जात असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – ठाण्यात आचारसंहितेचा भंग, मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

जळगाव येथील कुरिअरच्या कंपनीच्या एका टेम्पोमधून १५ मार्चला मध्यरात्री दोन गोण्या भरून रोकड मुंबई येथे नेण्यात येत होती. मुंबई नाशिक महामार्गालगत आटगाव परिसरात हा टेम्पो आला असता, एक मोटार या टेम्पोसमोर थांबली. मोटारीतून काहीजण खाली उतरले. पोलिसांकडे फायबरची काठी असते, तशी काठी त्यांच्याकडे होती. त्यांनी वाहन चालक आणि त्याच्या साथिदारांना पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच वाहन तपासणी करू लागले. त्यानंतर त्यांनी वाहनातील ५ कोटी ४० लाख रुपये रोकड भरलेल्या दोन गोणी घेऊन त्यांनी पोबारा केला. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५० टक्के रक्कम जप्त केली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ‘थ्री इ़डियट्स फेम’ सोनम वांगचुक यांचे आंदोलन का चिघळले? लडाखवासियांचा केंद्र सरकारवर राग कशासाठी?

अटकेत असलेल्या आरोपींमध्ये चंद्रकांत गवारे हा मुंबई पोलीस दलातून बडतर्फ आहे. त्याला २०१७ मध्ये बडर्फत करण्यात आले होते. त्यावेळी त्याने एका हिरे व्यापाऱ्याला धाक दाखवून त्याला लुटले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही रोकड जळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची आहे. कोट्यवधीची रोकड टेम्पोतून नेली जात होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.