Thane News / ठाणे – गोविंदांची पंढरी अशी ठाण्याची ओळख आहे. शहरात मोठ-मोठ्या दहीहंड्या उभारण्यात येतात. हंड्या फोडणाऱ्या मंडळांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे आयोजकांकडून ठेवण्यात येतात. हंड्या फोडण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथके थरांवर थर रचतात आणि तो थरार पाहण्यासाठी ठाणेकरही मोठी गर्दी करतात. यंदा ठाण्यातील नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टच्या माध्यमातून दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यात दहीहंडी फोडणाऱ्या मंडळांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्याबरोबरच रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
मानपाडा येथील टिकूजिनीवाडी रोडवरील गौरव स्वीट समोरील नेताजी सुभाष चंद्र बोस चौक (हैप्पी वेली)येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे २१ वे वर्ष आहे. मंडळाचे संस्थापक, भाजपा ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष रमेश आंब्रे, नगरसेविका व मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आंब्रे. मंडळाचे सरचिटणीस व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉ. सागर आंब्रे यांनी हा उत्सव आयोजित केला आहे.
गोविंदा पथकांसाठी बक्षिसे
या उत्सवास १५ ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्णजन्मोत्सवाने सुरूवात होणार आहे. १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील अनेक गोविंदाना निमंत्रण देण्यात आले असून १ लाख ११ हजार १११ रूपयांचे पहिले पारितोषिक विजेत्या पथकास देण्यात येणार आहे. तसेच, ४, ५, ६, ७ थराच्या पथकांना विशेष पारितोषिके, ७ थर लावणाऱ्या पथकास स्नेहा ताई नारीशक्ती गौरव पुरस्कार, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास मनोज सिंग थर संघ सन्मान पुरस्कार आणि ९ थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मानाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे रमेश आंब्रे यांनी सांगितले.
रुग्णांना मदतीचा हात
नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे. चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसे तर दिली जाणारच आहेत. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रूपयांचे अर्थसाहाय्य देखील करण्यात येणार आहे. या उत्सवास मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून नवयुग मित्र मंडळतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १लाख ११ हजार १११ रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे. या उत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , वनमंत्री गणेश नाईक, आमदार चित्रा वाघ, भाजप महामंत्री ॲड. माधवी नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.