ठाणे : आगामी सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना निर्भेळ, सकस व आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, ठाणे विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. येत्या १८ ऑगस्ट पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असून, येत्या प्रत्येक महिन्यालाही अशा तपासण्या सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर या दरम्यान भेसळयुक्त मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ विकणारे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

येत्या कालावधीत दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र असे अनेक सण उत्सव आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ, मसाले यांसारख्या खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ होते. याच संधीचा फायदा घेत काही व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात. दूध व माव्यात सिंथेटिक रंग, स्टार्च किंवा डिटर्जंटसारख्या हानिकारक पदार्थांची भेसळ केली जाते. तुपाऐवजी स्वस्त व निकृष्ट दर्जाचे तेल वापरले जाते; तसेच शिळा किंवा सडका मावा नव्या मालामध्ये मिसळून विकला जातो. अशा प्रकारच्या भेसळीमुळे ग्राहकांच्या पैशांची लूट तर होतेच, पण त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन अन्न विषबाधा, पोटाचे विकार, यकृताचे आजार यांसारख्या धोकादायक समस्या उद्भवू शकतात. यासर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मोहिमेत मिठाईसाठी लागणारे दूध, मावा, तेल, मैदा, तूप यांसारख्या कच्च्या मालाची तपासणी होणार आहे. तसेच मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांची व किचनची स्वच्छता, तसेच कारागिरांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. जुना किंवा शिळा मावा वापरला जाऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाईल. त्रुटी आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि नियम २०११ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.