ठाणे : ठाणे जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या कुडाळकर हेल्थ क्लबने सांघिक विजेतेपद पटकावले आहे. १५ नोव्हेंबरला ठाण्यातील ब्राह्मण विद्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातून वीस हेल्थ क्लबचे एकूण १२७ खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा ५३, ५९, ६६, ७४ किलो वजनी गटात घेण्यात आली होती. या चारही वजनी गटात कुडाळकर हेल्थ क्लबच्या प्रांजल सांगुळकर वी. नोअेल, अभिषेक बोऱ्हाडे, सिद्धांत कुडाळकर आदींनी सुवर्ण पदक पटकावत यशस्वी कामगिरी करत सांघिक विजेतेपद पटकावले. जिल्हास्तरिय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याने या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धासाठी करण्यात आली असल्याचे हेल्थ क्लबचे नितीन कुडाळकर यांनी सांगितले.
कल्याणच्या खेळाडूंना सुवर्ण पदके
कल्याण : ठाणे जिल्हास्तरीय वरिष्ठ गटाच्या ज्युदो स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला आहे. पूर्वा मॅथ्यू, पूजा गुप्ता, मानसी पोळ, हिमानी गांवकर, आशुतोष लोकरे, प्रितेश गांवकर या सहा खेळांडूनी आपापल्या वजनी गटात ही सुवर्ण पदके मिळवली आहेत. तर, येथीलच प्रवेंद्र सिंग याला रौप्य पदक तर, तरुण पाबळे व विशाल सिंग यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. सुवर्ण पदक संपादित केल्याने औरंगाबाद येथे २८ व २९ नोव्हेंबरला होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरिय स्पर्धेसाठी वरील सहा खेळांडूची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू व्हिक्टरी ज्युदो क्लबकडून खेळत असून त्यांना लिना मॅथ्यू व के. ए. मॅथ्यू या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यापीठ स्पर्धेत ठाणेकरांचे वर्चस्व
ठाणे : मुंबई विद्यापीठस्तरीय अॅथलेटिक्सच्या खेळांमध्ये विविध क्रीडा प्रकारांत ठाण्याच्या खेळाडूंनी विजयी मोहोर उमटविली आहे. मुंबईतील मरिन लाइन्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळविण्यााची कामगिरी केली. १०० मीटर धावणे व लांब उडी या प्रकारांत अपेक्षेप्रमाणे श्रद्धा घुले हिने सुवर्ण पदकावर नाव कोरले. १०० मीटरचे अंतर तिने १२.४ सेकंदांत ओलांडले. सर्वाधिक वेगवान महिला खेळाडूचा या स्पर्धेतील किताब तिने यावेळी मिळवला. तर अक्षया अय्यर हिने २५.४ सेकंदांत २०० मीटर अंतर धावत सुवर्ण पदक मिळवले. तर, मुलांमध्ये प्रथमेश घोगले याने लांब उडी प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. दर्शन देवरूखकर याने ४०० मीटरच्या अडथळा शर्यतीत संपूर्ण अंतर ५७.२ सेकंदांत कापत सुवर्ण पदक राखले. तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मात्र त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या सुवर्ण कामगिरीमुळे या खेळाडूंना २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नांदेड येथे खेळण्याची संधी मिळणार आहे.
डोंबिवलीत बॅडमिंटन सुपर लिग
कल्याण : कल्याणातील कौस्तुभ विरकर अकादमीतर्फे डोंबिवलीत तीनदिवसीय बॅडमिंटन सुपर लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ शहरांमध्ये बॅडमिंटन खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा आणि या शहरांतील खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीत वाढ व्हावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली जिमखाना येथे बुधवार ११ ते शुक्रवार १३ डिसेंबर रोजी बॅडमिंटन सुपर लिग या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून शुक्रवारी स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. कौस्तुभ विरकर अकादमी ही संस्था कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, विद्याविहार अशा विविध शहरांमधील बॅडिमटन पटूंसाठी गेल्या एक वर्षांपासून कार्यरत आहे. अवघ्या एका वर्षांत संस्थेची आठ केंद्रे उभी राहिली असून तब्बल १५० खेळाडू अकादमीत मार्गदर्शन घेत आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी ९७६९२३४६८६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सात वर्षीय परी ठक्करची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड
ठाणे : ठाण्यातील सेंट जॉन बाप्टिस्ट शाळेतील अवघ्या दुसरीत असलेल्या सातवर्षीय परी ठक्करची मलेशिया इथे होणाऱ्या कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ठाण्यातील सर्वात लहान खेळाडू असलेल्या परीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मलेशियातील काजन शहरात २१ व २२ नोव्हेंबरला होणाऱ्या या स्पर्धेत ती कनिष्ट वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिने आत्तापर्यंत अनेक स्पर्धामध्ये सुवर्ण व रौप्यपदके मिळवली आहेत.
एनकेटी महाविद्यालयाचे आडीवली गावात श्रमदान
ठाणे : शहरी वातावरणामध्ये वाढलेल्या तरुणाईला ग्रामीण भागातील समस्यांची ओळख व्हावी, तेथील परिस्थिती समजून त्यानुसार तेथील नागरिकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या निमित्ताने ठाण्यातील नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदा टिटवाळाजवळच्या अडीवली गावामध्ये श्रमदान शिबीर राबले. या विद्यार्थ्यांनी अडीवली हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले असून दरवर्षी या भागात विद्यार्थ्यांचे आठ दिवसांचे श्रमदान शिबीर पार पडत असते. जनजागृती आणि श्रमदान या दोन गोष्टींवर या शिबिरात भर देण्यात आला असल्याचे या शिबिरातील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
तरुणांच्या मनातील ‘गाव’ ही संकल्पाना धुरकट होत जात आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना काही दिवसा शहरातील गजबजाटापासून दूर, प्रदूषणापासून लांब जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर येथील रहिवाशांच्या जिवनशैलीचा एक भाग होऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांनी या निमित्ताने अनुभवली. खेडय़ांमध्ये स्वच्छता, आरोग्य, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा अशा अनेक समस्यांची माहिती या निमित्ताने अनुभवता आली. एनएसएसच्या या उपक्रमाच्या निमित्ताने येथील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करणार आहेत. तसेच येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या साहाय्याने नाल्यावर बंधारा बांधण्याचा उपक्रमही राबविला जाणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला हा उपक्रम २० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत पार पडणार आहे. या शिबिरामध्ये विविध विषयांवरील व्याख्याने, कोडी, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र, पथनाटय़, नेतृत्व विकास, प्रभातफेरी असे विविध उपक्रम या निवासी शिबिरात राबविले जाणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्रा. आरती सामंत यांनी दिली.
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा
ठाणे : तरुणांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी नाटकवेडय़ा तरुणाईसाठी अत्यंत चुरशीची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे राज्यस्तरीय आतंर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून व्हावे, या उद्देशाने कोकण कला अकादमी या संस्थेतर्फे आमदार चषक २०१५ राज्यस्तरीय आंतर महाविद्यायीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २४ व २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आनंद विश्व गुरुकुल, रघुनाथ नगर, ठाणे(प.) येथे होणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभास नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभागी व्हावे, असे अवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- प्रा. मंदार टिल्लू -९३२२८८००६९.
