ठाणे  : तायक्वांदो असोसिएशन ऑफ धुतीने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित धुळे येथील २९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत  ठाणे संघाने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावणारे विजयी खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती ठाणे तायक्वांदो अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी दिली. या स्पर्धेत ठाण्याचे प्रशिक्षक म्हणून आनंद पस्टे, मनोज भगत यांनी तर, संघ व्यवस्थापक म्हणून हनुमंत मिसाल व मंगेश औती यांनी काम पाहिले.
* पदक विजेते खेळाडू सुवर्ण पदक: भूमी वेलकट्टी (मीरा-भाइंदर),
* रौप्य पदक : आकाश औती (नवी मुंबई), दर्शन कांबळे (ठाणे शहर), अंविशा गालवे (कल्याण),
* कांस्यपदक : रोहित रावत (मीरा भाइंदर), शिद्देश नकोडंकर (नवी मुंबई), गौरी शिंदे (मुरबाड) यांनी या स्पर्धेत पदक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ ऑगस्ट रोजी  बदलापुरात वर्षां मॅरेथॉन
बदलापूर : बदलापुरात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवसेना कुळगाव-बदलापूर शहर शाखेतर्फे वर्षां मॅरेथॉनचे आयोजन १५ ऑगस्टला सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. शहरातील धावपटू, शालेय विद्यार्थी, पुरुष व महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास ११ गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून या गटांमध्ये प्रत्येक वयोगटातील धावपटूंना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट असून शिवसेनेच्या शाखा व नगरसेवकांकडे प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. शहरातील सर्वच नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपालिकेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केले आहे.

सुब्रतो फुटबॉल चषकमध्ये ठाणेकर पुढे
ठाणे : ठाणे जिल्हा क्रीडा विभागातर्फे १७ व १४ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय सुब्रतो फुटबॉल चषक स्पर्धेचे २४ जुलैला आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथमधील फातिमा शाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांचा अंतिम सामना हा सुलोचनादेवी सिंघानिया शाळा विरुद्ध वसंत विहार शाळा असा रंगला.   सिंघानिया शाळेने हा सामना १-० ने खिशात घातला. तर, १४ वर्षांखालील मुलांचा सामना  श्रीमा शाळेने सुलोचनादेवी सिंघानिया शाळेला ४-३ अशा गुणांनी नमवून जिंकला.

बदलापुरात रग्बीचे धडे
बदलापूर : रग्बी खेळ आता सगळ्या मुलांनी शालेय आयुष्यात खेळावा यासाठी ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनने पुढाकार घेतला असून तीन जुलैपासून शहरातील शाळांमध्ये याचे मार्गदर्शन सत्र सुरू होणार आहे. रग्बी खेळाला शालेय स्तरावर खेळण्यासाठी मान्यता मिळाली असून हा खेळ १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांना खेळता येणार आहे. या खेळाचे मार्गदर्शन करण्यासाठी वर्ल्ड रग्बी असोसिएशनचे सदस्य व महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक विकास चौरसिया उपस्थित राहणार आहेत. तीन जुलैला प्रथम शहरातील सेंट अँथोनी शाळा, योगी अरविंद गुरुकुल शाळा, एम.के. पाटील विद्यालय आदी शाळांमध्ये हे मार्गदर्शन सत्र होणार असून अन्य शाळांमध्ये दर दिवशी हे मार्गदर्शन सत्र सुरू राहणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे कोषाध्यक्ष यज्ञेश्वर बागराव यांनी दिली.

जलतरण स्पर्धेत ठाणेकरांचे सुयश
ठाणे: नेरूळ जिमखानातर्फे आयोजित जिल्हा जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरणपटूंनी पदके मिळवली. अश्नी जोशी हिने दहा वर्षांखालील वयोगटात झालेल्या फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. मल्लिका सिन्हा हिने बारा वर्षांखालील वयोगटात झालेल्या फ्री स्टाईल स्पर्धा प्रकारात सुवर्ण, बटरफ्लाय स्पर्धा प्रकारात रौप्य आणि ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. कल्पित सिंह याने दहा वर्षांखालील वयोगटात झालेल्या बॅकस्ट्रोक स्पर्धा प्रकारात सुवर्ण तर बटरफ्लाय स्पर्धा प्रकारात कांस्य पदक पटकावले. आभा मिराशीने  दहा वर्षांखालील वयोगटात बॅकस्ट्रोक क्रीडा प्रकारात रौप्य, बटरफ्लाय क्रीडा प्रकारात रौप्य आणि फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sport event across thane district
First published on: 30-07-2015 at 02:29 IST