लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : पावसाळा सुरू झाल्याने विविध प्रकारचे साथरोग या काळात डोके वर काढतात. या साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने शहराच्या विविध भागात विशेष जंतुनाशक, धूर फवारणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे.

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी या विशेष फवारणी मोहिमेचे नियोजन केले आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकातून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी डोंबिवली विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी शरद पांढरे, के. पी. जगताप उपस्थित होते. या विशेष मोहिमेत १२२ सफाई कामगार, १२२ पितळी फवारणी पंप, ३० धुराच्या मशीन, तीन धुराच्या जीप्स, ११ ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. सकाळ, संध्याकाळ ही फवारणी केली जाणार आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हातगाड्या सुरू

साथरोगाच्या नियंत्रणासाठी आयुक्तांनी विशेष फवारणी मोहीम सुरू केली असली तरी ज्या उघड्यावरील हातगाड्यांवरील खाद्य पदार्थांमुळे हे साथरोग पसरतात. त्या गाड्या ग प्रभाग सोडून नऊ प्रभागांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. संध्याकाळी चार वाजल्यापासून खाऊ गल्ल्या ग्राहकांनी भरून जातात. सर्वाधिक हातगाड्या डोंबिवलीत ह प्रभाग, ई प्रभाग, ड, अ प्रभागात लावल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.