ठाणे – भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व जलशक्ती मंत्रालय यांच्या निर्देशानुसार, तसेच राज्य शासन व जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने “स्टॉप डायरिया” ही महत्त्वपूर्ण जनजागृती मोहीम २० जून पासून राबविण्यास सुरु केली असून ३१ जुलै पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.
अतिसारासारख्या पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांपासून बालकांचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे, स्वच्छता आणि सुरक्षित पाणी यावर भर देणे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.
या अभियानात स्थानिक पातळीवरील पाणी स्रोत आणि स्वच्छतेच्या सुविधांचे व्यवस्थापन करण्यासह स्वच्छतेचा दर्जा राखण्याकरिता गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करणे, मैलागाळ व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करणे. तसेच घरगुती नळ जोडण्याची कार्यपद्धती तपासणे ही कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहेत.
तर, १६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत ग्रामस्थांना स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्यासाठी संस्था आणि समूहांमार्फत प्रशिक्षण देणे, छतावरील पाणी संकलन आणि पाणी साठवणुकीबाबत माहिती देणे,हातपंपांची तपासणी व दुरुस्ती करण्यासह स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्तता व स्वच्छ वर्तनाविषयी जनजागृती केली जाणार आहे.
सर्व विभाग एकत्रितपणे समन्वयाने काम करून ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेचा प्रभाव गावागावात जाणवेल अशा पद्धतीने राबवत आहेत. ही मोहीम केवळ आरोग्याशी संबंधित नसून, ती सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि सशक्त समुदाय विकासाची पायाभूत गरज आहे, म्हणून सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांनी या मोहीमेत सहभाग नोंदवला पाहिजे. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.