अंबरनाथः मोबाईल आणि त्यावर गेम खेळण्याचे वेड मुलांच्या जीवावर बेतत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर खेळू नको, दहावीचे वर्ष आहे, असे सांगितल्याने एका दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथे हा प्रकार समोर आला आहे.

गेल्या काही दिवसात मोबाईलच्या नादात अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. तासनतास मोबाईल पाहिल्याने शालेय वि्द्यार्थ्यांवर मानसिक परिणाम झाल्याचेही अनेक प्रसंग पाहायला मिळतात. महाविद्यालयीन तरूण – तरूणींसह अबाल वृद्धही तासनतास इंन्स्टाग्राम, युट्युब अशा समाज माध्यमांवर व्हिडीओ पाहत असल्याचे दिसून आले होते. तर मोबाईल पाहू न दिल्याने वाद आणि भांडणे झाल्याचेही प्रकार समोर आले होते. असाच काहीसा धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या नेवाळी भागात समोर आली आहे.

नेवाळी येथे एका सोळा वर्षीय दहावीच्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी मोबाईलवर जास्त काळ गेम खेळू नको, असा सल्ला दिला होता. तो दिवसभर मोबाईलमध्ये गेम खेळत असायचा. इयत्ता दहावीत असल्याने अतिरिक्त शिकवणी वर्ग सुरू असतात. त्यामुळे मोबाईल बंद कर असे पालकांनी सांगितल्याने त्या मुलाला राग आला. त्यावेळी त्याने संयम बाळगला. दुसऱ्या दिवशी पालक नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्यानंतर त्या मुलाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्महत्येचा प्रकार कळताच पालकांना धक्का बसला. मुलगा मोबाईलमध्ये बेटल ग्राऊंड प्रकारातील खेळ खेळत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच हिललाईन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकारानंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलवर गेम खेळू नको सांगितल्याने विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्याचवेळी अशा तासनतास मोबाईल वापरावरही निर्बंध घालण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनह केले जाते आहे.