ठाणे – जपानच्या कावासकी शहरात झालेल्या जागतिक दोरीवरील उड्यांच्या (जम्प रोप) स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूतील डोंबिवलीतील आठ स्पर्धक मुला, मुलींनी एकूण १६ पदके कमावून घवघवीत यश संपादन केले आहे. सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांची कमाई या स्पर्धक मुलांनी केली आहे.
दोरीवरून उडी मारण्याचे चापल्य, गती, वेग आणि अचूक साध्यता या निकषावर ही स्पर्धा खेळविण्यात आली. ३६ देशांमधील सव्वीसशे खेळाडुंनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण आठ स्पर्धक आणि एक प्रशिक्षक यांचा समावेश होता. या स्पर्धेतील बहुतांशी मुले डोंबिवलीतील होती. २७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा जपानमधील कावासकी शहरात घेण्यात आली.
या स्पर्धेत भूमिका नेमाडे हिने एक सुवर्ण, एशान प्रुथन एक सुवर्ण, एक रौप्य, तन्वी नेमाडे दोन रौप्य, एक कास्य, नाशिक येथील नमन गंगवाल याने दोन रौप्य, एक कास्य, अमन वर्मा एक रौप्य, एक कास्य, मानस मुंगी एक रौप्य, एक कास्य, पद्माक्षी मोकाशी एक कास्य अशी एकूण १६ पदके महाराष्ट्राच्या चमूने पटकावली आहेत. १६, १८ आणि १९ अशा वयोगटात एकेरी, दुहेरी, तिहेरी आणि मिश्र अशा गटात ही स्पर्धक मुले खेळली.
या विद्यार्थ्यांना अमन वर्मा मागील अनेक वर्षापासून दोरीवरील उड्यांचे प्रशिक्षण देत आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ते या खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतात. जपानमधील स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूने अधिकाधिक चापल्य दाखवून या स्पर्धेत अधिकची पदके मिळावीत यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षक वर्मा यांनी चांगला सराव करून घेतला होता.
महाराष्ट्राच्या याच चमूने जुलै २०२३ मध्ये अमेरिकेत झालेल्या दोरीवरील उडी चॅम्पियन स्पर्धेत, जुलै २०२४ मध्ये जपानमध्ये झालेल्या एशियन स्पर्धेत अशाच पध्दतीने यश संपादन करून पदके मिळवली होती. स्वखर्चाने या चमूने जपानमधील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू हे दोरीवरील उडीतील उच्च गुणवत्ता प्राप्त स्पर्धक आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शासन, खासगी, क्रीडा विषयक राखीव निधीतून निधीची उपलब्धता झाली तर त्यांना अधिकचे उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. हेच खेळाडु पुढे देशाचे नाव उंचावणार आहेत. त्यामुळे शासनाने दोरीवरील उड्यांच्या स्पर्धांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत प्रशिक्षक अमन वर्मा यांनी व्यक्त केले.