उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या ७५० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात हजाराहून अधिक टपाल पत्रांवर शुभेच्छा संदेश लिहिले आहेत. ही टपाल पत्र (पोस्ट कार्ड) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लष्करी अधिकारी, सिमेवरील जवान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, विविध वर्तमानपत्रांचे संपादक, प्रसिध्द क्रिकेट, क्रीडापटू, शिक्षणतज्ज्ञ, आपले आई-वडिल यांना कल्याण टपाल कार्यालयातून पाठविली आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात विविध प्रकारे साजरा केला जात आहे. या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आता माहिती तंत्रज्ञान, समाज माध्यम, मोबाईलमध्ये अडकलेल्या नवतरुण पिढीला टपाल पत्रांचा विसर पडला आहे. अनेक विद्यार्थ्यांना टपाल पत्र म्हणजे हे पुस्तकी माहिती असले तरी प्रत्यक्षात ते काय असते. त्याच्यावर काय मजकूर लिहायचा असतो हे माहिती नसते. त्यामुळे कल्याण मधील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, मुख्याध्यापिका सुजाता नलावडे, सहशिक्षक अनिल शिर्के, पंकज दुबे, संतोष जाधव, उमा पदमवार यांनी विद्यार्थ्यांना टपाल पत्रावर शुभेच्छा संदेश लिहिण्यास सांगून ती शुभेच्छा पत्र सन्मानिय व्यक्तिंना पाठविण्याचा निर्णय घेतला. शाळेने टपाल पत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली. ही पत्र लिहिताना आता समाज माध्यमांमुळे कुटुंबीय कसे मोबाईलमध्ये अडकून पडले आहेत. याचा विचार करुन काही पत्र मुलांनी आपल्या पालकांना लिहिली आहेत.

‘नोकरीच्या ठिकाणावरुन घरी परतल्यावर आमच्याशी संवाद साधा. आमच्याशी संभाषण करा. दिवसभर शाळेत काय झाले. काय शिकवले याची माहिती घ्या. आणि आमच्याशी संवाद साधून आमच्या शाळा अभ्यासक्रमातील त्रृटी शोधून आम्हाला मार्गदर्शन करा. वेळ मिळेल तेव्हा शाळेतील शिक्षकांशी संवाद साधा,’ अशा आशयाचा मजकूर विद्यार्थ्यांनी पत्रावर लिहून तो आपल्या पालकांना पाठविला आहे, असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपुरुषांनी दिलेले योगदान, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष देशाची सुरू असलेली घोडदौड, यासाठी विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तिंचे असलेले योगदान याविषयी पत्रात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. चौथा स्तंभ म्हणून वर्तमानपत्र बजावत असलेली कणखर भूमिका. यासाठी विविध वर्तमानपत्राच्या संपादकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश देणारी पत्र पाठविण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात बसवून एकत्रितपणे ही पत्रे लिहून घेण्याचा उपक्रम मागील १० दिवसांपासून सुरू होता. प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र म्हणजे काय, त्यावर काय, किती मजकूर लिहायचा असतो याची माहिती या उपक्रमाच्या निमित्ताने झाली, असे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले.प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्तक्षारातील आठ हजार टपाल पत्र १५ ऑगस्टपर्यंत मिळावित या उद्देशाने आठ हजार टपाल पत्र कल्याण टपाल कार्यालयाचे प्रमुख अशोक सोनवणे, टपाल कर्मचारी सुधाकर देव्हारे, योगेश हरड यांच्याकडे विद्यार्थी प्रतिनिधींनी सुपूर्द केली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे टपाल अधिकारी, शासनस्तरावर कौतुक होत आहे.

मोबाईल हे संवाद संपर्काचे झटपट साधन असले तरी टपाल पत्र हे जिव्हाळा, आत्मियता दाखविणारे हे महत्वपूर्ण साधन आहे. हे विद्यार्थ्यांच्या मनावर या उपक्रमाच्या निमित्ताने बिंबविण्यात आले. – गुलाबराव पाटील ,मुख्याध्यापक