कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना गेम झोनचे व्यसन लागले आहे. हे विद्यार्थी घरातून पालकांना आम्ही शाळेत चाललो आहोत असे सांगतात आणि तेथून ते घर परिसरातील गेम झोनमध्ये जाऊन विविध प्रकारचे खेळ खेळतात. यासाठी लागणारे पैसे विद्यार्थी घरातून आई, बाबांच्या खिशातून, बटव्यातून चोरतात, अशी धक्कादायक माहिती उघड होत आहे.
मोबाईल बरोबर अनेक विद्यार्थी गेम झोनची व्यसनी होत आहेत. कल्याणमधील नामवंत शाळेतील विद्यार्थी आपल्या आई, वडिलांना फसवून शाळेत न जाता गेम झोनमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या विद्यार्थ्यांनी घरातून आई, वडिलांंच्या बटवा, खिशातून, कपाटातील तिजोरी आणि स्वताच्या घरातील साठवून ठेवलेल्या पुंजीतून पैसे चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात कल्याणमधील गेम झोनमध्ये जात होते.मुलगा शाळेत येत नाही अशा तक्रारी शाळेकडून पालकांना करण्यात आल्यानंतर हा गेम झोन आणि घरातील पैशाच्या चोरीचा प्रकार उघडकीला आला आहे. आपल्या मुलांना नियमित सांगुनही मुले गेम झोनचा हट्ट सोडत नाहीत आणि गेम झोन चालक विद्यार्थी शालेय गणवेशात असुनही त्यांना गेम झोनमध्ये प्रवेश देत होता. यावर उपाय म्हणून कल्याणमधील काही पालकांनी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांची भेट घेतली. आपल्या विद्यार्थ्यांच्याबाबत घडत असलेला प्रकार सांगितला.
जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी विद्यार्थी आणि पालकांसह कल्याणमधील विद्यार्थी गेम झोनमध्ये खेळत असलेल्या ठिकाणी प्रवेश केला. तेथे २० ते २५ वयोगटातील तरूण गेम झोन चालवित असल्याचे आढळले. शाळेच्या वेळेत विद्यार्थी गणवेश घालून आपल्या गेम झोनमध्ये खेळण्यासाठी येतात. त्यांना तुम्ही या झोनमध्ये प्रवेश का देता. आलेला मुलगा शाळेतील आहे हे तुम्हाला कळत नाही का, असे प्रश्न जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी तरूण गेम झोन चालकाला केले. त्याने आम्ही याविषयी काही करू शकत नाही, असे बेलगाम उत्तर दिले. त्यावेळी संतप्त झालेल्या जिल्हाध्यक्ष भोईर यांनी गेम झोन चालकाच्या कानशिलात लगावल्या. एकेका विद्यार्थ्याने घरातून तीन ते चार हजार रूपयांची चोरी केली आहे.
यापुढे पुन्हा आपल्या गेम झोनमध्ये कोणत्याही शाळकरी विद्यार्थ्याला प्रवेश दिला. तशा तक्रारी प्राप्त झाल्यातर हा गेम झोन आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी गेम झोन चालकाला दिला. डोंबिवली, कल्याणमधील अनेक शाळा चालकांंनी काही विद्यार्थी गेम झोनची व्यसनी झाली असल्याचे सांगितले. आठवड्यातून तीन ते चार वेळा हे विद्यार्थी शाळेला दांड्या मारतात, असे शिक्षकांनी सांगितले. शाळांमध्ये गांजा, ई सिगारेटचे प्रकार सुरू झाले असताना विद्यार्थी गेम झोनची व्यसनी होत असल्याचा प्रकार उघडकीला येत आहे.