बदलापूरः हिमालयात आढळले जाणारे युरेशियन ग्रिफॉन जातीचे एक दुर्मिळ गिधाड मुंबईत आढळून आले होते. प्रवास आणि पाण्याअभावी थकलेल्या अवस्थेत आढळलेल्या या गिधाडावर सुमारे १८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी उडण्यास सक्षम वाटल्यानंतर या गिधाडाला माळशेजच्या घाटात मुक्तसंचारासाठी सोडण्यात आले. देशातील गिधाडांची संख्या कमी होत असताना मुंबईतील रॉ संस्था, अश्वमेध प्रतिष्ठान आणि डॉ. रीना देव यांच्या प्रयत्नाने या गिधाडाला नवा जन्म मिळाला आहे.

देशातील आणि राज्यातील गिधाडांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्नही केले जात आहेत. मात्र त्यात यश येताना दिसत नाही. त्यातच हिमालयात आढळणारे युरेशियन ग्रिफॉन जातीचे एक गिधाड तब्येत खालावल्याने मुंबईच्या एडस नियंत्रण कार्यालयाच्या आवारात अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले होते. रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) संस्थेच्या पवन शर्मा यांनी १३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉ. रीना देव यांच्याकडे हे गिधाड सोपवले. डॉ. रीना देव यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. हे गिधाड थकल्याने अत्यवस्थ झाले होते. त्याला अन्न आणि आरामाची गरज असल्याचे दिसून आले. दाखल केले त्यावेळी हे गिधाड मानही उचलत नव्हते. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर १५ डिसेंबरला या गिधाडाला मुरबाडच्या मासले बेलपाडा येथील रॉ आणि अश्वमेश प्रतिष्ठान संचलित पशुपक्षी संक्रमण आणि उपचार केंद्रात पाठवण्यात आले होते. येथे या गिधाडाचा आहार आणि त्याच्या जलद बरे होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. येथे असलेल्या ८० फुटांच्या उंच जाळीमध्ये काही दिवसात या गिधाडाने उडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. यशस्वी उपचार झाल्यानंतर तीन दिवसांपूर्वी ३० डिसेंबर रोजी या गिधाडाला मुक्त आकाशात सोडण्यात आले. माळशेज घाटात सर्वात उंच टेकडीवरून या गिधाडाला आकाशात सोडण्यात आले. यावेळी गिधाडाने उंच भरारी घेतली, अशी माहिती अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाणे : नव्या कळवा पुलावरील सुरक्षा साधने गायब, सुरक्षा साधने चोरीला गेल्याचा महापालिकेचा दावा

हेही वाचा – ठाणे : जिल्हा “नियोजन समिती बैठकीच्या” प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्या अभावी बैठकीला मुहूर्त नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिधाड असणे महत्वाचे

राज्यातील गिधाडांची संख्या ९८ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशिकच्या खोरीपाडा येथे गिधाडांचे खाद्य उपलब्ध करू दिले जाते. हे गिधाडांसाठी चालवले जात असलेले उपहारकेंद्र आहे. त्यामुळे या गिधाडाला प्रवासात खाद्य मिळावे म्हणून माळशेज येथून सोडण्यात आले. काही मिनिटात हे गिधाड नाशिकच्या या खोरीपाडा येथे जाऊ शकते. – अविनाश हरड, मानद वन्यजीव संरक्षक, ठाणे.