कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शिरगाव गावातील सुजाता रामचंद्र मडके या तरूणीची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिरगाव गावातील शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन या तरूणीने थेट बंगळुरमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत झेप घेतली आहे.

सुजाता हिचे कुटुंब हे शिरगाव मधील शेतकरी कुटुंब. शहापूरपासून १५ किमी अंतरावर हे गाव आहे. वडिल ठाणे जिल्हा परिषदेत लिपिक होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. शेती, नोकरी सांभाळून रामचंद्र मडके यांनी मिळणाऱ्या मिळकतीमधून आपल्या तीन मुली आणि एक मुलगा यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले. चारही मुले जिद्द, चिकाटी, हुशार असल्याने त्यांनी आपल्या आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

सुजाता घरातील धाकटी मुलगी. तिचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर तिने शहापूर येथील ग. वि. खाडे विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ होण्याची तिची तीव्र इच्छा होती. बिर्ला महाविद्यालयात तिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बी. ई.ची(तांत्रिक) पदवी प्राप्त केल्यानंतर सुजाताने डीआरसी, इस्त्रोमधील परीक्षा देण्यास सुरूवात केली.

या परीक्षा देत असताना तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून ती परिवहन विभागाची साहाय्यक मोटार वाहन विभागाची परीक्षा पास झाली. दोन वर्ष सुजाता मडके हिने ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून नोकरी केली. इस्त्रोच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतर सुजाताने परिवहन विभागातील नोकरीचा राजीनामा दिला. गेल्या आठवड्यात सुजात मडके बंगळुर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाली.

ठाणे येथे नोकरी करत असताना नोकरी सांभाळून इस्त्रोच्या परीक्षेसाठी सुजाता रात्रीच्या वेळेत अभ्यास करायची. दररोज आठ ते बारा तास अभ्यास झालाच पाहिजे, असा तिचा शिरस्ता होता. दिवसा नोकरी, रात्रीपासून पहाटेपर्यंत अभ्यास असे त्यांचे अभ्यासाचे सूत्र होते. शिरगावमधील ज्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुजाताने सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्याच शाळेतून तिचे आजोबा जिवा मडके, वडील रामचंद्र मडके यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. सुजाताला चित्रकलेचा छंद आहे. सुजाता हिने आपले स्वप्न पूर्ण केल्याने तिची आई सविता मडके यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सुजाता अतिशय धाडसी आणि तल्लख बुध्दीची पहिल्यापासून होती. तिची मोठी भावंड उच्च शिक्षण घेत गेली. त्याप्रमाणे सुजाता हिने मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. मुलीच्या हातून देशसेवेचे काम होणार आहे याविषयी आम्हा कुटुंबीयांना अभिमान आहे. रामचंद्र मडके वडील, शिरगाव.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम नेहमी लहान स्वप्ने बघू नका. मोठी स्वप्ने पाहा, असा संदेश तरूणांना देत असत. तीच प्रेरणा घेत आपण कठोर मेहनत, कष्ट घेत आपले शिक्षण पूर्ण केले. याच प्रेरणेतून आपणास इस्त्रोमध्ये स्थान मिळाले आहे. सुजाता मडके शास्त्रज्ञ, इस्त्रो.बंगळुरू.