ठाणे: दरवर्षीप्रमाणे आंब्याच्या हंगामात हमखास भाव खाऊन जाणार ” कोकणच्या हापूसची ” चव यंदा नागरिकांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच चाखता येणार आहे. गतवर्षी लागवडी दरम्यान झालेला अवकाळी यामुळे लागवडीचे आणि यंदा फळाला मोहर येत असतानाचा लवकर वाढलेली उष्णतेमुळे काढणीचे नियोजन ( क्रॉप सेटिंग ) काही अंशी बिघडले. यामुळे बाजारात मे महिन्याच्या अखेरपर्यंत टिकणाऱ्या कोकण हापूसची यंदा काही अंशी आवक येत्या आठवड्यात अत्यंत कमी होऊन मद्रासी हापूसची चव नागरिकांना घ्यावी लागणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. तर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही येणाऱ्या कोकण हापूस आंब्याच्या बरोबरीनेच मद्रासी हापूस म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या आंब्यांची आवक होते आहे.

कोकणातील आंबा उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम अनेक अडथळ्यांनी भरलेला होता. हंगामाच्या सुरुवातीलाच हवामानातील चढ-उतार, काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि तापमानातील फरक यामुळे उत्पादनात अडथळे आले. यामुळे बहुतांश आंबा पिकाचे लागवडीचे नियोजन बिघडले. कोकणातील हापूस आंबा हा देशातील आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो. कोकणात हापूस आंब्याची लागवड पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने केली जाते. यामध्ये रासायनिक खतांचा कमी वापर आणि सेंद्रिय पद्धतीवर भर दिला जातो. त्यामुळे या आंब्याची गुणवत्ता उच्च प्रतीची राहते.

कोकण हापूसची शेल्फ लाईफ म्हणजे टिकण्याचा कालावधी तुलनेने चांगली असल्याने वाहतूक व निर्यात करतानाही फळ सुरक्षित राहते. याचमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील मोठ्या बाजारपेठांमध्ये आणि परदेशातही कोकण हापूसची मोठी मागणी असते. यंदाही बाजारात हापूसला उत्तम मागणी होती तर ग्राहकांनी देखील याची चांगली खरेदी केली. मात्र आता येत्या आठवड्यात याची आवक कमी होऊन इतर ठिकाणाहून येणाऱ्या हापूसवरच नागरिकांचा आपली चव भागवावी लागणार आहे.

गणित कसे बिघडले?

कोकणातील आंबा मोहराच्या दारावर असतानाचा अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे बहुतांश फळे हि त्यावेळी गळून पडली. तर उर्वरित फळे उत्तम स्थितीत असतानाच फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उष्णता वाढली. आणि यामुळे फळ पिकल्याने झाडावर ठेवणे अशक्य झाले आणि शेतकऱ्यांनी तातडीने बाजारपेठेचा रस्ता गाठला. यामुळे काही दिवस आधीच हंगाम सुरु झाला. तर अनेक शेतकऱ्यांनी टप्प्याने मालाची विक्री करण्याऐवजी एकाच वेळी कृषी उत्पन्न समित्यांमध्ये आंबा विक्रीसाठी आणला. यामुळे आता आवक रोडावली असून येत्या आठवड्यात पूर्ण कमी होऊन दाक्षिणात्य राज्य आणि गुजरात मधून येणाऱ्या आंब्यावर हंगामाची भिस्त आहे. मात्र ग्राहकांकडून तरी सध्या या आंब्यांना हवी तशी पसंती येत नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

चौकटकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेली हापूस आंब्याची आवक

२९ एप्रिल – ९७०० क्विंटल ( अक्षय तृतीयेच्या मुहूर्तवार आवक वाढली. यामध्ये अर्ध्याहून अधिक आवक इतर हापूसची देखील होती )२८ एप्रिल – ३६८० क्विंटल

२५ एप्रिल – ९३३५ क्विंटल२४ एप्रिल – ९५६२ क्विंटल

( सुमारे १५०० ते ३००० रुपये पेटीने विक्री होत आहे. हीच किंमत मागील आठवड्यात सुमारे २५०० हे ३५०० इतकी होती )कोट

यंदा कोकण हापूसचा हंगाम कमी काळ राहिला. आवक कमी होण्यास सुरुवात झाली असून इतर ठिकाणाहून आलेल्या आंब्याची आवक काही अंशी वाढत आहे. अवकाळी आणि अधिक उष्णतेचा यंदाच्या कोकण हापूसला फटका बसला.- विजय भेंडे, आंबा व्यापारी