ठाणे : भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असून येथून मुंबई वडोदरा महामार्ग जाऊनही या मार्गावर थेट प्रवेश नसल्याने प्रवाशांना वाहतूक वळसा घालून तब्बल १८ किमीचा प्रवास करावा लागत होता. हे टाळण्यासाठी भिवंडीतील लामज सुपेगावला मुंबई वडोदरा महामार्ग जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन त्यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यामुळे वाहनचालकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार नसून त्याचबरोबर त्यांचे इंधन आणि वेळही वाचण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गाजवळून मुंबई वडोदरा महामार्ग जातो. परंतु हे मार्ग एकमेकांना जोडण्यात आलेले नाहीत. यामुळे प्रवाशांना वाहतूक वळसा घालून तब्बल १८ किमीचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत असून स्थानिक नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भिवंडी-वाडा मार्गावर लामज सुपेगाव गावाजवळून मुंबई वडोदरा महामार्गावर थेट प्रवेशद्वार निर्माण करावे, रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि दुरुस्ती करून अत्याधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करावी, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी केली होती.
१६० कोटी रुपयांचा निधी मंजूर
केंद्रशासनाचा महत्वाचा प्रकल्प असलेला मुंबई वडोदरा महामार्ग भिवंडी वाडा रस्ता येथून जातो. हा मार्ग भिवंडीतील लामज सुपेगाव येथे जोडण्याची मागणी भिवंडी लोकसभेचे खासदर सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या रस्ते जोडणी प्रकल्पासाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात खासदार म्हात्रे यांनी बुधवारी मंत्री गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
रोजगार संधी निर्माण होईल
नवीन अंतर्गत बदल (इंटरचेंज) तयार करून भिवंडी-वाडा मार्ग थेट एक्स्प्रेसवेने जोडावा. यामुळे वाहतूक वेगवान होईल आणि त्याचा स्थानिकांना फायदा होईल. तसेच भिवंडी-वाडा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होऊन ५ हजारहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होऊन स्थानिक तरुण आणि कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
प्रस्ताव अंतिम टप्यात
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांसह भिवंडीच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्वाचा दुवा ठरणार असून या प्रकल्पामुळे भिवंडी-वाडा परिसराचा विकास झपाट्याने होणार असल्याने या प्रकल्पासाठी यापूर्वीही मंत्री गडकरी यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यासोबत नुकताच झालेल्या भेटीत या जोडणी बाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून त्यासाठी सुमारे १६० कोटींचा निधी देखील मंजूर केला असून प्रस्ताव अंतिम टप्यात असल्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली.