ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त (निलंबित) शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी अटक केली होती.ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.
मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाकडून त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर यांना पथकाने पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा साथिदार सुशांत सुर्वे याला देखील अटक केली.
हे प्रकरण ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास विभागाकडून केला जात आहे. त्यासोबतच या कारवाईची दखल घेऊन शंकर पाटोळे यांना २ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी पाटोळे, ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.