डोंबिवली : डोंंबिवली पूर्वेतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेची दत्तनगरमधील स्वामी विवेकानंद शाळेच्या इमारतीचा एक भाग चाळीस वर्षापूर्वी भाजपच्या ज्येष्ठ कर्यकर्त्या आणि माजी नगरसेविका सुधाताई साठे यांच्या कार्यकाळात बांधण्यात आला होता. त्यामुळे साठे बाईंची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे सुरू करण्यात आले आहे.
सुधाताई साठे या स्वामी विवेकानंद शाळा संचलित राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा होत्या. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. डोंबिवली नगरपालिका काळातही त्या नगरसेविका होत्या. कल्याण डोंबिवली पालिकेत १९९५ मध्ये लोकप्रतिनिधी राजवट आली. त्यावेळी या लोकप्रतिनिधी राजवटीत सुधाताई साठे नगरसेविका म्हणून निवडून गेल्या होत्या. शिक्षिका म्हणून सुधाताई साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांची घडण झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी देश, विदेशात सर्वोच्च पदावर नोकरी, व्यवसाय करत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्य करत असताना दिवसेंदिवस स्वामी विवेकानंद दत्तनगर शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. आयरे, म्हात्रेनगर परिसरातील सर्व स्तरातील मुलांना शाळेत आल्यानंतर प्रवेश मिळालाच पाहिजे, असा साठेबाईंंचा दंडक होता. एकही विद्यार्थी, पालक शाळेला इमारत नाही, खोल्या नाहीत, विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही अशी कारणे न एकता परत जाता कामा नये. यासाठी सुधाताई साठे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय शिक्षण संस्थेने दत्तनगरमध्ये चाळीस वर्षापूर्वी एक मजली इमारतीची उभारणी केली. साठेबाईंंच्या काळात या इमारतीची उभारणी झाली म्हणून नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक साठेबाईंची शाळा म्हणून त्या इमारत, शाळेला ओळखून लागले.
आता ही इमारत जुनीजीर्ण झाली होती. विद्यार्थी, शिक्षकांच्या जीविताला धोका नको म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊन स्थापत्य निर्माण वास्तुविशारद सेवा संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष नाचणे, सहकारी प्रशांत उर्फ डेमी दुनाखे, नंदू जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. लोकसहभाग, माजी विद्यार्थी, पालक यांचा या इमारत पुनर्विकास कार्याला हातभार लागेल यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन इमारत सात माळ्याची असणार आहे. या इमारतीत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत.
वर्ग खोल्यांमध्ये आवश्यक वायुविजन, लख्ख प्रकाश असेल या नियोजनातून ही इमारत उभारली जात आहे, असे प्रशांत दुनाखे यांनी सांगितले. झोपडपट्टी, दुर्बल घटकांमधील मुलांचे शिक्षण, कलागुणांना वाव मिळेल. अशा मुलांनाही शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. ही मुलेही शिक्षण, कौशल्यात पुढे आली पाहिजेत यासाठी साठेबाईंनी श्रीकला संस्कार संस्थेची स्थापन केली. अनेक वर्ष दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करते.
इमारतीचे आर्युमान विचारात घेऊन स्वामी विवेकानंद दत्तनगर शाखेतील संस्थेच्या माजी उपाध्यक्षा सुधाताई साठे यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, त्याप्रमाणे वाढत्या वर्ग खोल्यांचा विचार करून या इमारतीचा पुनर्विकास केला जात आहे. – संजय कुलकर्णी अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षण संस्था.
