लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील येथील एमआयडीसी भागातील नेकणीपाडा बस थांब्याजवळ उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे पत्र कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभागाने एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांना मंगळवारी पाठविले आहे.

पत्र देऊनही एमआयडीसीकडून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील नेकणीपाडा बस थांब्याजवळ सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर, या नवीन बांधकामाच्या शिवसेना शाखेच्या फलकावर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या बेकायदा बांधकामावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या प्रतिमांचा फलक लावून शिवसैनिक सचीन कासार हे बेकायदा बांधकाम करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. बेकायदा बांधकामातील शाखेच्या फलकावर सचीन कासार यांची प्रतीमा आणि ठळक अक्षरात नाव आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांसाठी ५११ कोटीचा निधी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

दोन दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेतील ई प्रभागातील अधिकारी नेकणीपाडा बस थांब्या जवळील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले होते. पण त्यांना डोंबिवली पश्चिमेतील एका माजी नगरसेवकाचा कारवाई न करण्यासाठी दमदाटी करणारा फोन आला. त्यामुळे कारवाई पथक तेथून निघून गेले, असे कळते. बेकायदा गाळ्यामध्ये शिवसेना शाखा सुरू करायची आणि हळूहळू बाजुची जागा विविध व्यवसायांसाठी देण्याचे नियोजन बांधकामधारकाने केले आहे, असे एमआयडीसीतील रहिवासी, तक्रारदारांनी सांगितले.

पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम होणार नाही, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दोन महिन्यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मग नेकणीपाडा येथील बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना पाठबळ का देत नाहीत, असे प्रश्न नागरिक करत आहेत. शिवसेनेचा फलक लावून सुरू असलेल्या या बेकायदा बांधकामाची जोरदार चर्चा समाज माध्यमांत सुरू आहे. हे बेकायदा बांधकाम कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे असो ते पालिका किंवा एमआयडीसीने जमीनदोस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

आणखी वाचा-राहुल गांधी यांच्या यात्रेचा भिवंडी काँग्रेसला ‘हात’भार

नेकणीपाडा येथील बेकायदा बांधकामाच्या वाढत्या तक्रारी नागरिक एमआयडीसीकडे करत आहेत. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. या बेकायदा बांधकामा विरुध्द प्रशासनाने कारवाई केली नाहीतर आपण परिसरातील नागरिकांसह या शाखेसमोर साखळी उपोषण करू, असा इशारा डाॅ. शुभदा साळुंके यांनी दिला आहे.

शिळपाटा रस्त्यावरील नेकणीपाडा बस थांबा भाग एमआयडीसी हद्दीत येतो. या भूक्षेत्राचे नियोजन प्राधिकरण एमआययडीसी असल्याने पालिकेच्या ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून नेकणीपाडा येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या पत्रासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेकणीपाडा भागाचे नियोजन प्राधिकरण एमआयडीसी आहे. त्यामुळे या भागातील बेकायदा बांधकामासंदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांना कारवाईसाठी कळविले आहे. -भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.