डोंबिवली- डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील एका मोकळ्या भूखंडावर दररोज रात्रीच्या वेळेत गुपचूप कचरा टाकणाऱ्या मुंब्रा येथील एका टेम्पो चालकाकडून कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेशावरुन बाराशे रुपये दंड वसूल केला. डोंबिवली एमआयडीसीतील भूखंड क्रमांक ५४ वर एक टेम्पो चालक दररोज कचरा टाकत असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाला कळविले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या भूखंडावर कचरा टाकणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी या भागात पालिका कामगार नियुक्त केले. दिवसभर पाळत ठेऊनही कोणीही कचरा टाकण्यास येत नव्हते.

भूखंडावर रात्रीच्या वेळेत कचरा टाकण्यात येत असावा म्हणून उपमुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे यांनी रात्रीच्या वेळेत या भूखंडावर पाळत ठेवली. त्यावेळी रात्रीच्या वेळेत एक इसम टेम्पो घेऊन आला. त्याने भूखंडावर कचरा खाली करण्यास सुरुवात करताच रात्रीच्या वेळेत पाळत ठेऊन असलेल्या आरोग्य अधिकारी घुटे व त्यांच्या पथकाने टेम्पो चालकाला पकडले. पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात नेले. दर्शन बाळकृष्ण भोईर (३६, रा. जाईबाई निवास, मुंब्रा-पनवेल रस्ता, हनुमान मंदिर जवळ, ठाणे) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. एमआयडीसीतील मोकळ्या भूखंडावर दर्शन कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याने सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचा भंग केला म्हणून पालिकेने त्याच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि स्वच्छतेचा भंग केल्याने बाराशे रुपयांचा दंड ठोठावला. पुन्हा अशी कोणतीही कृती करणार नाही, अशी हमी घेतली.

कल्याण डोंबिवली परिसरातील कोणी व्यक्ति, संस्था यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून सार्वजनिक स्वच्छतेचा भंग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उप मुख्य आरोग्य अधिकारी घुटे यांनी दिला आहे.