कल्याण : ‘आम्ही या भागातील भाई आहोत. या ठिकाणी कोणीही आवाज करायचा नाही. आम्ही सांगेल तसेच वागायचे, अन्यथा एकेकाला हालहाल करून मारू,’ अशा डरकाळ्या फोडत कल्याण पूर्वेतील साहिल उर्फ बिट्या संजय मोरे आणि त्याच्या समर्थक दोन गुंडांनी आईसक्रिम खाऊन घरी चाललेल्या एका १६ वर्षाच्या मुलाला रस्त्यात अडवून रात्रीच्या वेळेत बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी या अल्पवयीन बालकाच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी बिट्यासह त्याच्या गुंडांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून घेतला आहे. कल्याण पूर्वेतील कैलासनगर भागातील हनुमाननगर विठ्ठलवाडी भागात हा मारहाणीचा प्रकार गुरूवारी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडला आहे.

अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिल उर्फ बिट्या संजय मोरे, दीपक ढेरे आणि साहिल (पूर्ण नाव नाही) या तीन गुंडांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठलवाडी कैलासनगर भागात या तीन गुंडांची दहशत वाढल्याने परिसरातील रहिवासी त्यांच्या उपद्रवाने त्रासले आहेत. या गुंडांच्या उपद्रवामुळे कुटुंबीय आपल्या मुलींना घराबाहेर पाठवत नाहीत. पोलिसांनी या तिन्ही गुंडांचा बिमोड करण्याची मागणी कैलासनगर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता कलमाने या तीन गुंडांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोळा वर्षाच्या अल्पवयीन बालकाने पोलीस ठाण्यातील तक्रारीत दिलेली माहिती, अशी की आपण आपल्या घर परिसरातील हनुमान मंदिराजवळील एका हातगाडीवर जाऊन तेथे आईसक्रिम खाल्ले. रात्री साडे दहाची वेळ होती. आईसक्रिम खाऊन मी एकटाच घरी परत जात होतो. त्यावेळी आपल्या परिचयाचे साहिल उर्फ बिट्या, दीपक ढेरे आणि साहिल असे तीन जण वाटेत भेटले. त्यांनी मला उद्देशून ‘तुझ्या वडिलांना सांग पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घे, अन्यथा आमच्याशी गाठ आहे,’ असे बोलून बिट्या आणि त्याच्या दोन समर्थक गुंडांनी अचानक तक्रारदार अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

अल्पवयीन मुलगा तिन्ही गुंडांच्या गराड्यात सापडला होता. मारहाण होत असल्याने तो बचावासाठी ओरडा करत होता. पण या तीन गुंडांची परिसरात दहशत असल्याने बालकाच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही किंवा घराबाहेर पडले नाही. या तिघांनी मिळून बालकाला पकडून खेचत जनसेवा मंडळ कार्यालय परिसरात नेले. तेथे त्याला मारहाण केली.

याठिकाणी आमचीच चालते. आम्ही येथले भाई आहोत. आमच्या सांगण्याप्रमाणे येथल्या लोकांनी वागायचे. अन्यथा प्रत्येकाची अशी हालत करून टाकू, असे मोठ्याने ओरडा करत बोलून तिन्ही गुंडांनी परिसरात दहशत माजवली. बालकाला बेदम मारहाण होत असल्याने आणि हे गुंड आपणासही काही करतील या भीतीने परिसरातील रहिवाशांनी घराची दारे बंद केली. दुकानदार दुकाने बंद करून निघून गेले. हाताने मारहाण करून झाल्यावर दीपक ढेरे या गुंडाने एक बांबुची काठी आणून काठीने बालकाला मारहाण केली. या मारहाणीत बालक गंभीर जखमी झाला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पडवळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.