Dahihandi 2025 : ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवितात, त्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी भागात ठाकरे गटाने रविवारी रात्री निष्ठेची सराव दहीहंडी आयोजित केली होती. या सराव दहीहंडीमध्ये भाग घेण्यासाठी ठाण्यातील विविध गोविंदा पथके थर रचण्यासाठी आले होते. या हंडीला निष्ठेची दहीहंडी नाव दिल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या पथकांना आकर्षक बक्षिसांचे देखील वितरण झाले.

ठाणे शहरात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचा सामावेश आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ निर्माण झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात. या मतदारसंघाची हद्दा वागळे इस्टेट पासून ते कोपरी (ठाणे पूर्व) पर्यंत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे शहरातील या तिन्ही मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. परंतु काही पदाधिकारी अद्यापही ठाकरे यांच्या सोबत आहेत. ठाण्यात दोन्ही गटांमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहेत.

दहीहंडी ही ठाण्यात मोठ्या स्तरावर आयोजित केली जाते. ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हटले जाते. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यामुळे ठाण्यात मोठ्याप्रमाणात दहीहंडीचे आयोजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच कोपरी -पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी विभागात ठाकरे गटाचे युवासेना विस्तारक राजेश वायाळ-पाटील यांच्या माध्यमातून निष्ठेची सराव दहीहंडी रविवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे शहरातील अनेक गोविंदा पथकाची उपस्थिती दिसून आली. सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास आकर्षक पारितोषिक देण्यात आली. या दहीहंडीला निष्ठेची दहीहंडी नाव देण्यात आल्याने चर्चा रंगल्या होत्या. हंडी पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली होती.

या दहीहंडीसाठी ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे देखील उपस्थित होते. दहीहंडीनिमित्ताने सर्वजण एकत्र येत असतात. टेंभीनाक्यावर आनंद दिघे साहेब दहीहंडी साजरी करायचे. त्यावेळी जात-पात-धर्म यापलिकडे जाऊन दहीहंडी साजरी व्हायची. परंतु आता जे राजकारण सुरु आहे ते अत्यंत गलिच्छ आहे अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.