लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्ताने एक पत्र लिहीले आहे. महाराज खरंच येऊन बघा.. चाकू, सुरे, कोयते, तलवारी, बंदूका घेऊन गुंड सर्रास फिरत आहेत. कोण आमचा मुडदा पाडेल याची भिती स्त्यावरून चालताना वाटत आहे. हे आमच्या जीवावर उठले आहेत. तुमच्या राज्यात रयतेला अभय होते. आता आम्हाला कोण वाचविणार ? ती माती कुठे गेली महाराज? हे स्वराज्य नाही महाराज असे विचारे यांनी पत्रात म्हटले आहे.
लहानपणापासून आम्ही आपल्या स्वराज्याबद्दल ऐकत आलो. महाराजांमुळे आमचे अस्तित्त्व आहे. तुम्ही आमचे आदर्श आहात. महाराज तुम्ही रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. त्याप्रमाणे तुमच्या मुर्तीसमोर उभे राहून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ढाण्या वाघ आमच्या रक्षणासाठी ‘शिवसेना’ नावाचे स्वराज्य घेऊन उभा राहिला. ५८ वर्षांचे त्यांचे शिवधनुष्य या भेकडांनी स्वत:च्या क्षुल्लक स्वार्थासाठी तोडून टाकले. स्वराज्याची ही वाताहत पाहून खूप बैचेन वाटत आहे. धर्म आणि जातीच्या नावाने रयतेच्या मनात विष कालविले जात आहे. काहीजण तुमचे नाव घेऊन हिंदूत्त्वाचा गैरवापर करत आहेत. हे तुमचे मावळे नाहीत असे विचारे यांनी पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
महाराज खरंच येऊन बघा.. चाकू, सुरे, कोयते, तलवारी, बंदूका घेऊन गुंड सर्रास फिरत आहेत. रस्त्यावर चालताना भिती वाटत राहते, कोण आमचा मुडदा पाडेल. हे आमच्या जीवावर उठले आहेत. तुमच्या राज्यात रयतेला अभय होते. आता आम्हाला कोण वाचविणार ? ती माती कुठे गेली महाराज? सत्याच्या बाजून उभे राहणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे. ही सत्ता रयतेच्या मनात दहशत निर्माण करत आहे. हे स्वराज्य नाही महाराज… असे विचारे म्हणाले.
आणखी वाचा-डोंबिवलीत विद्यार्थ्याला मारहाण करणारे आरोपी मोकाट, ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार
बळीराजाला आज मुलभूत हक्कांसाठी सरकारविरोधात लढावे लागत आहे. तुमचा सोन्याचा नांगर यांनी भांडवलदारांना विकला आहे. आज बलात्कारी आमदाराला हे सरकार मंत्रीपद देत आहे. आमच्या आई-बहिणी जिथे सुरक्षित नाहीत. ते स्वराज्य नक्कीच नाही. यांना माफी नाही, यांचे राज्य उलथविण्याची वेळ आली आहे. आम्ही सगळे मावळे या रणांगणात उतरून लढणार. या हुकुमशाही विरोधात आम्ही उभे राहणार. शिवबंधन आम्ही कधीच सैल होऊ देणार नाही. लढाई सच्चाईची आहे, सत्याचा विजय होणार आहे. क्रांतीची मशाल धगधगणार. हुकमशाही विरुद्ध शिवशाहीचा विजय होणार आणि हा विजयच आमच्याकडून तुमच्यासाठी मानाचा मुजरा असे पत्राच्या शेवटी म्हटले आहे.