ठाणे – यंदा दिवाळीच्या काळात फटाके वाजविण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने ठाणे शहरातील हवेच्या गुणवत्तेत घसरण झाल्याची बाब समोर आली आहे. यंदा दिवाळीपूर्वी आणि आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्तेचा ठाणे महापालिकेच्या प्रदुषण विभागाने अभ्यास केला असून त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवा प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे. यंदा दिवाळीत फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. मात्र, संध्याकाळच्यावेळी झालेल्या पावसामुळे तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गेल्यावर्षी म्हणजेच, २०२४ मध्ये दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता, यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ७.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील ३ वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील हवा प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता, २०२३ मध्ये दिवाळी कालावधील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये ६२.६ टक्के इतकी वाढ झाली. तर, २०२४ मध्ये दिवाळी कालावधीत निर्देशांकात ३३.९ टक्के वाढ झाली होती, असे निदर्शनास आल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

हवा गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने ठाणे शहरात दिवाळी २०२५ कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनिअर केमिस्ट ओमसत्याशिव परळकर यांनी हा अभ्यास केला. यामध्ये दिवाळी पूर्व आणि दिवाळी कालावधीत म्हणजेच लक्ष्मीपूजन दिवशी ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार, दिवाळी पुर्वी म्हणजेच, ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी हवेतील धूलिकणांचे प्रमाण १४३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर (ug/m³) इतके नोंदले गेले. तर नायट्रोजन ऑक्साईड (NOx) चे प्रमाण ३१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, आणि सल्फर डायऑक्साईड (SO₂) चे प्रमाण १३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके होते. यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक १४१ इतका नोंदवला गेला. तर दिवाळी कालावधीत २१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक होता. त्या दिवशी धूलिकणांचे प्रमाण १३९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण ३० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण १७ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके आढळले. यानुसार त्या दिवशीचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५७ इतका होता, जो ‘मध्यम ते खराब’ श्रेणीत मोडतो.

ध्वनी प्रदुषणात वाढ

दिवाळीच्या कालावधीत ध्वनी पातळी मध्येही वाढ झाल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. ध्वनी प्रदूषणात ३.२ टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी कमाल ध्वनी पातळी ८६ डेसिबल एवढे प्रमाण नोंदले गेले होते; तर यंदा ते वाढून ८९.२ डेसिबल इतके झाले आहे.

हरित फटाकेच वाजवायला हवेत – मनीषा प्रधान

यंदा पावसामुळे प्रदूषणाच्या सरासरी प्रमाणात काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत असले तरी पाऊस थांबल्यानंतर धुलिकणात अचानक मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही धोकादायक स्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी केवळ हरित फटाक्यांकडे आपला कल नेणे ही काळाची गरज आहे. पावसामुळे ठाण्यातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवरच राहिला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदली गेली, असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.