ठाणे : जिल्ह्यातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी शैक्षणिक संस्थांसाठी शालेय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही नोंदणी राज्य शासनाच्या Pre-School Registration Portal (ECCE) वर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ठाणेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.
पूर्व प्राथमिक शाळा, नर्सरी, लहान शिशू (जूनियर केजी), मोठा शिशू (सीनियर केजी) अशा कोणत्याही स्वरूपात शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांनी आपली नोंदणी education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Pre-School Registration टॅबवर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये ३ ते ६ वयोगटातील मुलांना एकसंध आणि नियोजनबद्ध शिक्षण सुविधा देण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी शाळा आणि केंद्रांनी आपली नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिला आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
१. शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे
२. इमारत पूर्णत्वाचा दाखला
३. आरोग्य व स्वच्छता प्रमाणपत्र