Amit thakare :ठाणे – ठाण्यात साहित्यवलय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अमित ठाकरे हे देखील आज कार्यक्रमात आले होते. यादरम्यान त्यांनी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्याकडून दुखण्यावर औषध घेतले आणि काही वेळातच त्यांना एक त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना कार्यक्रमातून निघून जावे लागले. नेमके काय झाले होते जाणून घ्या…
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंट यांच्यावतीने शुक्रवारी साहित्यवलय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर होत्या. त्याचबरोबर मनसे नेते अभिजित पानसे, दिग्दर्शक, कवी विजू माने, अभिनेते सुयश टिळक यांची देखील उपस्थिती होती. लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा या पुरस्काराचे द्वितीय वर्ष होते. या कार्यक्रमात विविध साहित्य प्रकारांतील नामवंत लेखक-लेखिकांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या ३५० पुस्तकांमधून या लेखकांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमात पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्याशी संगीतमय संवाद साधण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रमुख म्हणून अमित ठाकरे हे उपस्थित होते. यादरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने अमित ठाकरे यांना नीट चालता येत नव्हते. या अवस्थेत देखील ते पुरस्कार सोहळ्याला पोहोचले होते. पुरस्कार सोहळा सुरू असताना आपला पाय दुखत असल्याचे त्यांनी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्याकडे बोलून दाखविले. यानंतर जोगळेकर यांनी आपल्याजवळ असलेली पेन किलरची गोळी त्यांना दिली. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या पायाचे दुखणे पुन्हा सुरू झाल्याने त्यांना कार्यक्रमातून निघून जावे लागले.