नवी मुंबई येथील चर्चमध्ये एका संस्थेकडून मागील तीन वर्षांपासून बेकायदेशीररित्या बालकांची आश्रमशाळा चालविली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने चर्च वजा आश्रमशाळेत आढळून आलेल्या ४५ अल्पवयीन मुलांची उल्हासनगर आणि नेरुळ येथील शासकीय बालगृहात रवानगी केली आहे. या आश्रमशाळेत महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, उदयपूर, उडीसा, तामिळनाडू या ठिकाणांहून आलेली लहानमुले देखील आढळून आली आहेत. तर संबंधित संस्था चालकाकडे बालकांसाठी आश्रमशाळा चालविण्याबाबतचे कोणतेही अधिकृत कागदपत्र आढळून आले नसल्याने त्याची बाल कल्याण समितीकडून चौकशी सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई येथील सी वूड परिसरात एक चर्च आहे. या चर्चमध्ये परिसरातील नागरिक प्रार्थनेसाठी देखील येतात. या ठिकाणी बेघर वयोवृद्ध, मतिमंद नागरिकांबरोबरच अल्पवयीन मुलांचा मागील काही वर्षांपासून सांभाळ केला जात आहे. परंतु, मागील काही दिवसात या ठिकाणी लहान मुलांची संख्या वाढत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकारी वर्गाने शुक्रवारी चर्चला अचानक भेट दिली. यावेळी केवळ तीन लहान खोल्यांमध्ये ४५ अल्पवयीन मुले तसेच इतर बेघर आणि मतिमंद वयोवृद्ध नागरिक अत्यंत अस्वच्छ स्थितीत राहत असल्याचे अधिकाऱ्यांना निदर्शनास आले. संबंधित चर्च चालविणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट या नावे २००६ साली संस्था नोंदणीकृत असल्याचे त्याने सांगितले. मात्र अधिकाऱ्यांना संस्था अधिकृत असल्याबाबतचे कोणतेही ठोस कागदपत्रे आढळून नाही. संस्थेत इतक्या मोठ्या संख्येने बालके कुठून आली, त्यांचे माहिती, कागदपत्र याबाबत देखील कोणतेही दस्तऐवज अधिकाऱ्यांना मिळाले नाहीत.

त्याचबरोबर बालकांना सांभाळण्यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा संस्थेत नसून केवळ लोकांनी दिलेल्या मदतीच्या पैशांतून या मुलांचे गुजराण सुरु असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. तसेच यातील बहुतांश मुलांची शाळा देखील बंद असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या ठिकाणी राहणाऱ्या वृद्धांचा सांभाळ देखील हीच मुले करत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी चर्चमध्ये राहत असलेल्या ४५ मुलांची उल्हासनगर आणि नेरुळ येथील वसतिगृहात रवानगी केली आहे. यामध्ये १३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. संबंधित चर्च आणि संस्था चालविणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीची बाल कल्याण समिती तर्फे चौकशी सुरु आहे. तर आढळून आलेली सर्व मुले किती दिवसांपासून येथे राहात होती, त्यांच्याकडून कुठले गैरकामे तर करवून घेतली जात नव्हती ना, याची देखील बाल कल्याण समितीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर कौटुंबिक कलहामुळे पालकांनी पाठवलेली बालके, एक पालक मयत असलेली बालके, शिक्षण देण्यास असमर्थ असलेल्या पालकांनी आपल्या मुलांना येथे पाठविले असल्याचे संस्थेच्या लोकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बाबत संबंधित चर्च आणि संस्थाचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सदर चर्च मध्ये बेकायदेशीररित्या ३ ते १८ वयोगटातील मुलांना ठेवण्यात आले होते. संस्थाचालकाला सुरु असलेली बालकांची आश्रमशाळा अधिकृत असल्याचे कोणतेही कागदोपत्री पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची तात्काळ शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच संबंधित संस्थाचालकाची चौकशी सुरु असून त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.– सुवर्णा जाधव, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane an illegal ashram school was started in the church amy
First published on: 06-08-2022 at 19:40 IST