EknathShinde, Thanyachi Durgeshwari,TembhiNakaNavratri2025 : ठाण्याच्या टेंभी नाका येथील प्रसिद्ध धर्मवीर आनंद दिघे यांचा नवरात्रोत्सव यंदा अधिक भव्य आणि विशेष ठरणार आहे. श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित या उत्सवात यंदा दक्षिण भारतातील बृहदेश्वर मंदिर आणि उत्तर भारतातील चारधाम यांचा देखावा साकारण्यात येणार असून, भाविकांना दोन्ही तीर्थक्षेत्रांचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्याची अद्वितीय संधी मिळणार आहे.

१९७८ साली ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनखाली नवारात्रौत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. यंदा या उत्सवाचे ४८वे वर्ष आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला नवारात्रौत्सव ठाणे शहरातील मानाचा उत्सव मानला जातो. दिघे यांची दुर्गेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी असल्याचे म्हटले जाते. यासाठी या देवीच्या दर्शनाकरिता केवळ ठाणे शहरातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त येत असतात. त्यामुळे दरवर्षी या देवीचा देखावा हा वेगवेगळ्या संकल्पांवर साकारला जातो. यावर्षीचा देखावा देखील असा काहीसा खास आहे. यंदा देखाव्याच्या माध्यमातून दक्षिणेतील बृहदेश्वर मंदिर आणि उत्तरेतील चारधामचे दर्शन घडणार आहे.

यंदाचा देखावा कसा असणार ?

यावर्षीच्या देखाव्याची लांबी ११० फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला ४५ फूट आणि पुढच्या बाजूला ५५ फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारण ७५ फुटांपर्यंत असणार आहे. या देखाव्यासाठी एकूण १२५ खांब वापरले असून, प्रत्यक्षात २६ खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत. या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची २९ फूट असून, ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनले आहे.

स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर, ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत, असे म्हटले जाते. या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे. बृहदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आलेला नाही. त्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले, ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले अशा सगळ्या लोकांना श्री दुर्गेश्वरीच्या चरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांसाठी नवस म्हणा किंवा त्या लोकांसाठी आपण एक गाऱ्हाणे मांडत आहोत. त्या अनुषंगाने या मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चारधाम मंदिरांची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. कलादिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरु आहे.

प्रवेशद्वारावर २४ बाय २९ फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती २९ फुटी बृहदेश्वर मंदीराच्या शिवलींगाचे समानत्व साध्य करते. तिच्या आसपास चारधाम देवालये उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. सध्या जागेवर १२५-१५० लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग, डिझानिंग असे मिळून एकूण २००-२५० कलाकार दिवस रात्र काम करत आहेत. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत.