शीळ, मुंब्रा तसेच कळवा भागातील तीस हजारहून अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद गेल्या महिनाभरापासून होत असून अशा संशयास्पद विद्युत मीटरची तपासणी टोरेंट कंपनीच्या पथकाने सुरु केली आहे. या तपासणीदरम्यान मुंब्रा येथील कौसा भागातील मलिक रेसिडेन्सी या आलिशान इमारतीत १७ विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे पथकाला आढळून आले आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकांवर वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

२० हजार ग्राहकांचा वीज वापर शुन्य असल्याची नोंद –

ठाणे जिल्ह्यातील कळवा, शीळ आणि मुंब्रा या भागांमध्ये टोरेंट कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. याठिकाणी एकूण २ लाख ८० हजारांच्या आसपास वीज ग्राहक आहेत. वीज ग्राहकांच्या मीटरची नोंदणी घेऊन त्याप्रमाणे त्यांना वीज देयक आकारण्यात येते. परंतु गेल्या महिनाभरात तीस हजारहून अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्येही २० हजार ग्राहकांचा वीज वापर शुन्य तर उर्वरित १० हजार ग्राहकांचा वीज वापर ३० युनीटच्या आतमध्ये असल्याची नोंद झाली आहे. घरामध्ये पंखा तसेच ट्युब लाईटचा वापर होतो आणि त्यासाठी ५० युनीटच्या पुढेच वीजेचा वापर होतो. त्यामुळे वीज वापर कमी दाखवलेल्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचा संशय कंपनीला होता.

वीज कायद्यानुसार कठोर कारवाई होणार –

या पार्श्वभूमीवर कंपनीने पथके नेमून अशा मीटरची तपासणी सुरु केली आहे. या तपासणीमध्ये मुंब्रा येथील कौसा भागातील मलिक रेसिडेन्सी या आलिशान इमारतीत १७ विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे पथकाला आढळून आले आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकांवर वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

वीजचोरीत मुंब्रा अव्वल –

“शीळ, मुंब्रा तसेच कळवा या भागातील वीजचोरी होऊ नये यासाठी टोरेंट कंपनीची पथके नियमितपणे काम करत आहे. त्यात वीजचोरीत मुंब्रा अव्वल असल्याचे आढळून आले आहे. याठिकाणी नागरिक मीटर घेण्यास टाळाटाळ करत आहेत आणि बेकायदा जोडणी घेऊन वीज वापर आहेत. अनेक पांढरपेशा लोकही वीजचोरी करताना दिसतात. त्यातच आता येथील मलिक रेसिडेन्सी या आलिशान इमारतीत १७ विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. वीजचोरी हा फौजदारी गुन्हा असून तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.”, असे टोरेंट कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मीटर बदलण्यास कंपनी मदत करणार –

“शीळ, मुंब्रा तसेच कळवा या भागातील बहुतेक जुने मीटर एकतर सदोष किंवा छेडछाड केलेले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिसरातील वीज परिस्थिती आणि संबंधित कामांचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच बोलावलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली असून त्यात त्यांनी कंपनीला ग्राहकांवर थेट कारवाई करण्याऐवजी पुढील दोन महिन्यात जुने मीटर टप्प्याटप्प्याने बदलण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्या शिफारशीला मान देऊन सोसायट्यांना आवाहन करण्यात आले आहे. सोसाट्यांनी पुढे येऊन जुने मीटर बदलण्यासाठी कंपनीकडे अर्ज करावा. कंपनी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मीटर बदलण्यास मदत करेल, तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या सेवा वाहिन्या सुधारणा करेल. ऑगस्ट महिन्यात संपत असलेल्या विलासराव देशमुख योजनेंतर्गत थकबाकी असणाऱ्या ग्राहकांनी देयक भरावे. संपूर्ण व्याजमाफी देणारी अशी योजना पुन्हा उपलब्ध होणार नाही.” असे कंपनीने म्हटले आहे.