ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाण्यातील नागरिक वाहतुक कोंडीमुळे बेजार झाले आहेत. ठाणे बेलापूर मार्गावर नवी मुंबईतील दिघा ते ठाण्यातील कळवा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. तर मुंबई नाशिक महामार्गावर साकेत पूल ते मानकोली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. मंगळवारी सकाळी ठाणे बेलापूर मार्गावरील विटावा बोगद्यामध्ये कंटेनर अडकल्याने तसेच मुंबई नाशिक महामार्गावर खाडी पूलाजवळ मोटार बंद पडल्याने ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.
ठाणे बेलापूर मार्गावरून ठाणे शहरातील हजारो नोकरदार कामानिमित्ताने नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास विटावा रेल्वे बोगद्यामध्ये एक कंटेनर अचानक बंद पडला. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. ही मार्गिका अरुंद असून कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. दिघा ते कळवा चौका पर्यंत वाहतुक कोंडी झाल्याने नागरिक मेटाकुटीला आले होते. सकाळी ९.३० नंतरही येथील वाहतुक कोंडी सुटली नव्हती. कळवा -विटावा भागातून कंटेनरला बंदी असतानाही हे वाहन येथे कसे पोहचले असा प्रश्नही आता विचारला जात आहे. हा कंटेनर नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होता.
दुसरीकडे याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावर खाडी पूलभागात अचानक एक मोटार बंद पडली. मुंबई नाशिक महामार्गावर रस्त्यांची वाईट अवस्था, वाहनांचा भार त्यात वाहन बंद पडल्याने कोंडीत भर पडली. त्यामुळे ठाण्याहून भिवंडी, कल्याणच्या दिशेने आणि तेथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. साकेत पूल ते मानकोली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दररोज ठाणे, भिवंडीत कोंडी होत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बंद पडलेला कंटेनर व मोटार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कोंडी वाढली होती. ठाण्यातील वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि त्यानुसार रस्त्यांची अपुरी क्षमता हे वारंवार होणाऱ्या कोंडीमागचे प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठाणे बेलापूर मार्ग व मुंबई-नाशिक महामार्ग या दोन्ही मार्गांवर रोज हजारो वाहने धावतात. परंतु किरकोळ अपघात, वाहन बंद पडणे किंवा दुरुस्तीचे काम सुरु झाले तरी संपूर्ण मार्गावर अडथळा निर्माण होतो, असे चालकांनी सांगितले.