ठाणे : भिवंडी-कल्याण रोड मार्गावरुन चहा पिण्यासाठी निघालेल्या तरुणाची दुचाकी खड्ड्यात जाऊन तोल गेल्याने अपघाती मृत्यू झाला. राज सिंह (१९) असे मृत मुलाचे नाव असून खड्ड्यात दुचाकी आदळल्याने तो रस्त्याकडेला पडला. त्याचवेळी भरधाव कंटेनर त्याच्या शरिरावरून गेला. अपघातात राज याचा मित्र देखील जखमी झाला आहे. या घटनेमुळे भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातानंतर जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भिवंडी येथील टेमघर भागात राज सिंह हा वास्तव्यास होता. त्याच्याकडे एक दुचाकी असून राज आणि त्याचा मित्र अबीर विश्वास असे दोघेजण १६ ऑक्टोबरला मध्यरात्री १.३० वाजता इमारतीखाली गप्पा मारत बसले होते. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास त्यांनी चहा पिण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही भिवंडी- कल्याण मार्गाने कल्याणच्या दिशेने दुचाकीने चहापिण्यासाठी निघाले. त्यावेळी राज हा दुचाकी चालवित होता. ते भिवंडी येथील साईबाबा मंदिर परिसरात आले असता, त्यांच्या मागून दोन कंटेनर देखील वाहतुक करत होता.

त्याचवेळी येथील एका खड्ड्यामध्ये त्यांच्या दुचाकीचे पुढील चाक गेले. एका कंटेनरची त्यांना धडक बसली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यावेळी राज हा दुसऱ्या कंटेनरच्या चाकाखाली आला. तर अबीर हा जखमी झाला.

या अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून तेथून पळून गेला. राज याच्या डोक्याला, हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. अबीर याने रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या एका रिक्षा चालकाला थांबविले. त्याचवेळी त्यांचा एक मित्र देखील तेथे आला. रिक्षा चालक आणि मित्राच्या मदतीने अबीर याने राज याला भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात मोटरवाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत कलम १३४ (अ), १३४ (ब), १८४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १०६, १२५ (अ), १२५(ब), २८१ आणि ३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.