ठाणे : वनमंत्री गणेश नाईक आणि ठाणे महापालिकेतील अनियमतता तसेच कथित भ्रष्टाचारा विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आमदार संजय केळकर या कडव्या शिंदे विरोधक नेत्यांवर ठाणे जिल्ह्यातील निवडणुकांची जबाबदारी सोपवून भाजपाने एक प्रकारे शिंदे यांनाच आव्हान उभे केल्याची चर्चा आता रंगली आहे. भाजपने ठाणे नवी मुंबई सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असा आग्रह धरणाऱ्यां मध्ये केळकर आणि नाईक यांचा समावेश होतो. नाईक यांनी तर ठाण्यात फक्त कमळ अशी घोषणा यापूर्वीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांची निवड म्हणजे शिंदे यांना आव्हान असेच मानले जात आहे.

वन मंत्री झाल्यापासून गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी परिसरात मध्यंतरी नाईक यांनी घेतलेल्या बैठकीत ‘ठाण्यात फक्त भाजप’ अशी हाक त्यांनी दिली होती. त्यानंतर वर्तकनगर येथील भाजप विभाग कार्यालयातील एका बैठकीत ‘ठाण्यात भाजपची सत्ता आणायची असेल, तर येथील अहंकाररूपी रावणाचे दहन करावे लागेल’ असे वक्तव्य नाईक यांनी केले होते.

नवी मुंबईत तर गणेश नाईक आणि शिंदे समर्थकांमध्ये विस्तव देखील जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर तुमची बाजू नेत्यांकडे मांडणारा पहिला मी असेल असेही नाईक म्हणाले होते. यापार्श्वभूमीवर बुधवारी भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारी नेमल्याने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नाईक यांच्याकडे ठाण्यासोबत नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मिरा भाईंदर, उल्हासनगर आणि कल्याण, डोंबिवलीची ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवी मुंबईत संजीव नाईक यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपवून भाजपने शिंदे यांना डिवचले आहे.

संजय केळकर निवडणूक प्रमुख

भाजपचे ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर हे गेल्याकाही वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात सातत्त्याने आक्रमक भूमिका घेताना दिसतात. महापालिकेतील अनियमितता, कथित भ्रष्टाचार, बेकायदा बांधकामे या सारख्या मुद्द्यांवर केळकर यांनी घेतलेली भूमिका शिंदे सेनेत अस्वस्थता निर्माण करणारी ठरली. एकनाथ शिंदे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या आपला दवाखाना योजनेत झालेल्या घोळांची मालिकाच मध्यंतरी केळकर यांनी मांडली होती. असे असताना संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचे निवडणूक प्रमुख संजय केळकर म्हणून संजय केळकर यांची नियुक्ती करुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाईक आणि केळकर हे दोन्ही नेते भाजपने स्वबळावर निवडणूका लढवाव्यात या मताचे आहेत. नाईक यांना तर नवी मुंबईत महायुती नकोच आहे.

प्रतिक्रिया

भाजपने नेमलेल्या निवडणूक प्रभारी आणि प्रमुख पदांवर मंत्री, खासदार, आमदारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गणेश नाईक आणि केळकर यांच्या नियुक्तीमध्ये विशेष असे काही नाही. एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचा तर प्रश्चच नाही. महायुती होईल की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील. नाईक केळकर नव्हे. -ज्येष्ठ पदाधिकारी, शिंदे गट.