ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जेट्टी ( जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग आणि विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. त्यामुळे भविष्यात बुलेट ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वात शहर विकास विभागाने चर्चासत्राचे संयोजन केले. त्यात, केंद्र सरकारची नगर नियोजन संघटना, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका), नगर रचना आणि मूल्यांकन विभाग, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि वसई – विरार महानगरपालिका यांचे प्रतिनिधी तसेच बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, विविध संघटना यांचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये एकूण १२ स्थानके आहेत. त्यापैकी ४ स्थानके ही ( मुंबई, ठाणे, विरार, बोईसर) महाराष्ट्रातील आहेत. या स्थानक परिसरांचा नियोजनपूर्वक विकास करणे प्रस्तावित आहे. यासाठी भारत सरकार, जपान सरकार व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. यापैकी, ठाणे व विरार स्टेशन परिसराचा नियोजनबद्ध विकास आराखडा स्थानिक महापालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी जायका व नगरविकास विभाग संयुक्तपणे करत आहे. या प्रकियेत नियोजनामध्ये सर्व भागधारक घटकांचा समावेश करून त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात सर्व भागधारकांनी सहभागी होऊन या प्रकल्पाची आखणी समजून घ्यावी. त्यात सरकारला अपेक्षित काय आहे, नागरिकांना कोणकोणत्या सुविधा देता येतील, यावर विचार करावा.
केंद्र सरकारचा हा संवाद उपक्रम संपूर्ण प्रकल्प क्षेत्रात होणार आहे. त्याची सुरुवात ठाणे आणि विरार येथील स्थानक परिसर विकास चर्चेने होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि नागरी विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव डी. थारा यांनी दृश्य प्रणालीद्वारे केले. हाय स्पीड रेल्वे स्थानक परिसर विकासासाठी धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यातील विषय, आव्हाने, संधी यावर विचारमंथन करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना या प्रकल्पाचा फायदा व्हावा, राज्यात या परिसराचा ट्रान्सिट ओरिएंटेड विकास व्हावा यादृष्टीने हे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास विभाग) असीम गुप्ता यांनी या चर्चासत्राचे सूत्र स्पष्ट करताना केले. हाय स्पीड रेल्वेच्या राज्यातील स्टेशनबाबत राज्याची भूमिका नगर विकास व मुल्यनिर्घारण विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी मांडली. बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या स्टेशन परिसराची नियोजनबद्ध आखणी करण्यात येत आहे. त्यातून नियोजनाचा चांगला आदर्श तयार होईल, असेही भोपळे यांनी सांगितले.
‘प्रोजेक्ट स्मार्ट’बद्दल नगरविकास विभागाच्या सहसचिव, नगर विकास विभागाच्या संचालक सुलेखा वैजापूरकर यांनी सादरीकरण केले. तर, एकूण हाय स्पीड रेल्वे प्रकल्प, आतापर्यंतची प्रगती यांचा आढावा नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेझ आणि मुख्य आर्किटेक्ट कामिनी शर्मा यांनी सादर केला. जायकातर्फे साईचरो अकिमुरा, मुझुकी ओसावा टोमोनी सातो, योचीही हार्दा, कोजी यामादा या प्रतिनिधींनी बुलेट ट्रेन स्टेशनमुळे जपानमध्ये कसे बदल झाले आणि भारतात कोणत्या संधी आहेत, याचे विवेचन केले. तर, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. दिपक सावंत यांनी स्थानिक विकासाबाबत सादरीकरण केले. त्याप्रसंगी, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त एम.एम. सूर्यवंशी उपस्थित होते. चर्चासत्रात चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विविध विषयांवर विचारमंथन झाले. त्यात, केंद्रीय गृह आणि नागरी विकास मंत्रालयातील संचालक रोहिना गुप्ता, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.
कैलाश शिंदे, एमएसआरडीसीचे मुख्य नियोजक सुनील मराळे, पीएमआरडीएचे नगर नियोजन संचालक अविनाश पाटील, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, शैलश पुराणिक, राजन बांदेलकर, सचिन मिरानी आदी सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक, नगर रचना संग्राम कानडे यांनी या दिवसभराच्या या चर्चासत्राची सांगता केली.
रोजगार उपलब्ध होणार
या प्रकल्पामुळे उद्योजक आकर्षित होतील. त्यातून रोजगार निर्मिती होईल. त्याकरता उद्योजकांना कोणकोणत्या सुविधा असाव्यात याविषयीची मांडणी राज्याचे उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंग कुशवाह यांनी चर्चासत्रात केली. हाय स्पीड रेल्वे स्थानक परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
असे असेल ठाणे बुलेट ट्रेन स्थानक
या मार्गावरील ठाण्यातील स्थानक परिसर विकास करताना २५ टक्क्याहून अधिक जागेवर हरित क्षेत्र राखले जाणार आहे. ठाणे हाय स्पीड स्थानक भारतातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन असेल. त्यात, बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस स्टेशन, जेट्टी ( जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्ते यांच्याद्वारे विमानतळ जोडण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सार्वजनिक वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध होतील. या सर्व सुविधा अत्यंत नियोजनबद्ध एकमेकांना पूरक पध्दतीने जोडण्यात येतील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.