ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेने सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तसेच विसर्जन टाक्या, खाडी घाट, फिरती विसर्जन वाहने, मूर्ती स्वीकृती केंद्रे अशी व्यवस्था केली आहे. यासंदर्भात नागरिकांना सुलभ माहिती मिळावी यासाठी महापालिकेने ‘हरित विसर्जन’ (Eco Visarjan) मोबाईल अॅप आणि संकेतस्थळ सुरू करण्यात केले आहे.

ठाणे महापालिकेने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट अधिक विसर्जन व्यवस्था उपलब्ध केली आहे. एकूण १३४ ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये २३ कृत्रिम तलाव, ७७ विसर्जन टाक्या (हौद), १५ फिरती विसर्जन वाहने, ९ खाडी घाट, १० मूर्ती स्वीकृती केंद्रे याचा समावेश आहे. विसर्जन काळात दोन सत्रांमध्ये मनुष्यबळाची नेमणूक केली जाणार असून, खाडी घाटांवर क्रेन आणि बार्ज यांसारखी यंत्रसामग्री देखील तैनात केली जाणार आहे. तसेच खाडी घाटांवर फक्त ६ फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींचेच विसर्जन करता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. नागरिकांनी घाटावर उपस्थित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि सुरक्षा सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राव यांनी केले आहे.

ठाणे महापालिकेच्या या अॅप आणि संकेतस्थळावरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील विसर्जन स्थळांची माहिती मिळणार असून, इच्छित स्थळाची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. कृत्रिम तलाव, विसर्जन टाक्या, खाडी घाट, फिरती विसर्जन वाहने, मूर्ती स्वीकृती केंद्रे यांची माहिती देखील अॅपवर पाहता येणार आहे. त्यासाठी https://ecovisrjan.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा QR कोड स्कॅन करा.

नागरिकांना आवाहन

‘हरित विसर्जन’( Eco Visarjan) अॅप डाऊनलोड करून किंवा ecovisrjan.com या संकेतस्थळावर नोंदणी करून विसर्जनाची पूर्वतयारी करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

अ‍ॅप वापरण्याची पद्धत

iPhone वापरकर्ते: App Store वरून ‘Eco Visarjan’ डाउनलोड करा

Android वापरकर्ते: Play Store वरून ‘Eco Visarjan’ डाउनलोड करा

सर्व वापरकर्त्यांसाठी संकेतस्थळ: https://ecovisrjan.कॉम