Thane ठाणे – मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील विविध ठिकाणचे रस्ते चिखलमय होऊन निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनचालक आणि पादचारी या दोघांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरातील बाळकुम, साकेत आणि भिवंडी या भागातील रस्त्याची अवस्था ही अधिकच गंभीर झाली असल्याचे चित्र आहे.
बाळकुम हे ठाणे शहरातील वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हा परिसर भिवंडी, माजिवडा, कापूरबावडी आणि ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांना जोडतो. शिवाय, शहरातील विविध रस्ते येथे एकत्र येतात. वर्षभरापूर्वी या परिसरात इस्कॉन मंदिर आणि नमो द ग्रॅड सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा विविध शहरातील नागरिक पर्यटनासाठी येत असतात. तसेच भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. यामुळे विविध शहरातील महिला आणि पुरूष कामानिमित्ताने बाळकुम मार्गे प्रवास करत असतात. परिणामी, अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ इथे वाढली आहे. त्यात या भागात इमारतींचे बांधकाम तसेच काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहेत. असे असताना, ठाणे शहरात ऑक्टोबर महिन्यातही कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे खोदकामांदरम्यान बाहेर पडलेली माती आणि वाळू या पावसामुळे ओलसर होऊन रस्त्यांवर चिखलाचे थर तयार झाले आहेत. त्यामुळे रस्ते निसरडे बनले असून अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना या चिखलमय रस्त्यांवरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भिवंडी, कशेळी, काल्हेर, साकेत, बाळकुम, कापूरबावडी, माजिवडा, ठाणे स्थानक या भागांमध्ये रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. काही ठिकाणी चिखलामुळे वाहतुकीलाच अडथळा निर्माण झाला आहे. वाहनांच्या चाकांमध्ये हे चिखल साचू लागले आहेत. यामुळे वाहनचालक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.
एका दुचाकीस्वाराने सांगितले, चिखलावर दुचाकीचे चाक नीट चालत नाही. थोडासा तोल गेला तरी गाडी घसरते. त्यामुळे कोणत्याही क्षणी गाडी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने स्वच्छता विभागाकडून चिखलमय झालेले रस्ते स्वच्छ करून घ्यावे अशी मागणी आहे.
