ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये तब्बल २५ वर्षानंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने काही महिन्यांपूर्वी खेळविण्यात आले असतानाच, त्यापाठोपाठ आता याच मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडू सराव करणार आहेत. या मैदानात येत्या १७ मार्च रोजी कोलकत्ता नाईट रायडर्स आणि आरसीबी टीमचे खेळाडू सराव करणार असून त्यासाठी महापालिका प्रशासनाने खेळाडूंच्या सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याची तयारी सुरु केली आहे.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी नव्हती. यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रीकेट सामने होत नसल्याने क्रीडा प्रेक्षागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख निर्माण झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार करण्यात आल्यामुळे या मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळविणे शक्य झाले.

नव्या खेळपट्टीमुळे तब्बल २५ वर्षानंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने मैदानात पार पडले. ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर, २०२१ रोजी हे सामने झाले होते. त्यापाठोपाठ आता याच मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडू सराव करण्यासाठी येणार आहेत. कोलकत्ता नाईट रायडर्स आणि आरसीबी टीमने खेळाडूंच्या सरावासाठी मैदानाची नोंदणी केली आहे. यानिमित्ताने ठाणेकरांना भारतीय संघाबरोबर इतर देशाच्या संघातील खेळाडूंना पाहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महापालिका प्रशासनाने खेळाडूंच्या सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याची तयारी सुरु केली असून त्याची पाहाणी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी टीमचे खेळाडू सराव करणार असून या पार्श्वभूमीवर तेथील व्यवस्थेचा आढावा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला. तसेच सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.