Thane Navratri 2025 / ठाणे – नवरात्रीत भाविकांना सर्वात जास्त उत्सुकता असते ती देवीदर्शनाची! ठाण्यात शारदीय नवरात्रौत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण पसरले आहे. विविध सांस्कृतिक संस्था, मंडळे तसेच रहिवासी मंडळांनी पारंपरिक पद्धतीने देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली असून भव्य मंडप, रोषणाई आणि सजावटीमुळे ठाणे झगमगून निघाले आहे. जर तुम्हालाही दर्शनासाठी जायचं असेल, तर ठाण्यातील या देवीला नक्की भेट द्या.
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी
दिवंगत आनंद दिघे यांनी १९७८ रोजी ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्रौत्सवाची सुरूवात केली. श्री जय अंबे मॉं सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो. लालबागच्या राजाप्रमाणे टेंभी नाक्याच्या देवी प्रसिद्ध आहे. अतिशय प्रसन्न मुद्रा हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्ये आहे. चेहऱ्यावरील तेज आणि डोळे हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्ये आहे.
आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे. स्वत: दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे. ठाण्यातील या दुर्गेश्वरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीकडे दरवर्षी लाखो भाविक साकडं घालण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. ही देवी ठाणे स्टेशनपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
संकल्प प्रतिष्ठान ठाणे
ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरात संकल्प प्रतिष्ठान म्हणजेच शिवसेना (शिंदेगट) नेते रविंद्र फाटक यांच्यावतीने नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी राजस्थानच्या जयपूरहून आणलेल्या संगमरवरी दगडातून जयपूरच्याच कारागीराने संपूर्ण मंदिर उभारलेले आहे.
नवरात्रीच्या दिवसात या मंदिरामध्ये सजावट केली जाते. या देवीची मूर्ती कायमची स्थायी स्वरूपी असून नवरात्रीमध्ये इथे घटस्थापना केली जाते. या ठिकाणी ९ दिवस मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जातो. या गरब्याला मोठमोठे कलाकार भेट देत असतात. ही देवी वागळे इस्टेट येथील रघुनाथ नगर मध्ये संकल्प चौकात आहे.
श्री अंबे मॉ, मानपाडा
माजी नगरसेवक रमेश आंब्रे यांच्या नवयुग मित्र मंडळच्यावतीने ठाणे शहरातील मानपाडा परिसरात नवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाच्या वतीने श्री अंबे मॉं या देवीची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते. यंदा या उत्सवाचे २१ वे वर्ष आहे. यंदा पारंपरिक, सांस्कृतिक आदी उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये मराठा, वाल्मीकी, तेलुगू, उत्तर भारतीय, सिंधी, अग्रवाल, केरला, गुजराती, कन्नड आदी समाजांचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये सप्तश्रृंगी पाठ, हरिपाठ, भजन संध्या, भव्य आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा, हवन, महाप्रसाद, मुख्यमंत्री आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी कॅन्सर नमोग्राफी कॅम्प आदी विविध कार्यक्रमदेखील ठेवण्यात आला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्या पूजन व सन्मान सोहळा याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ही देवी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टिकूजीनीवाडी, मानपाडा येथे आहे.
चंदनवाडीची देवी
साईलीला महिला बचत गट नवरात्र उत्सव मंडळ आणि शिवसेना ठाकरे गट चंदनवाडी शाखा यांच्यावतीने नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या उत्सवाचे ७वे वर्ष आहे. या उत्सवाच देवीची प्रतिष्ठापना करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त गण मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि देवीची आराधना करतात.
शिवाईनगरची देवी
शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ यांच्यावतीने नवरात्रौत्सवाचे आयोजन केले आहे. कै.सुधाकर चव्हाण यांच्यावतीने या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यंदा उत्सवाच्या सजावटीमध्ये काल्पनिक महालाची सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी रास -गरबाचे देखील आयोजन केले जाते.