ठाणे – जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या विविध खात्यांमध्ये तब्बल ४५२ कोटी ३९ लाख रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी अनेक महिन्यांपासून शिल्लक असल्याची माहिती उघड झाली आहे. या ठेवींचा परतावा संबंधित खातेदारांना मिळवुन देण्यासाठी, खातेदारांचा शोध घेण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जनजागृतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील रक्कम “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” म्हणजेच डिफ मध्ये हस्तांतरित केली जाते. मात्र, खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना या पैशावर पूर्ण हक्क असतो आणि ते कधीही ही रक्कम परत मिळवू शकतात. हा निधी म्हणजे ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षण करणारा निधी असून, रिझर्व्ह बँक या पैशाची संरक्षक म्हणून काम करते. ठेवीदार किंवा वारसदाराने संबंधित बँकेत अर्ज करून, आवश्यक कागदपत्रांसह दावा केल्यास, बँक पडताळणी करून संपूर्ण रक्कम व्याजासह परत देते. याच पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे.
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने “तुमची संपत्ती तुमचाअधिकार” या नावाने मोहीम राबविण्यात येत आहे. या तीन महिन्यांच्या विशेष अभियानाचा उद्देश ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये जमा असलेल्या दावा न केलेल्या ठेवींबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि पात्र ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देणे हा आहे.
ठाणे जिल्ह्यात ही मोहीम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली असून ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि सर्व बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ठाणे जिल्ह्यातील विविध बँकांमधील एकूण ११ लाख ३८ हजार ४२१ खात्यांमध्ये ४५२.३९ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी आहेत आणि या सर्व खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ही मोहीम सुरू केली जात आहे.
ही मोहीम तीन महत्त्वाच्या घटकांवर आधारित आहे जागरूकता, सुलभता आणि कृती. पहिला उद्देश म्हणजे लोकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींच्या संकल्पनेबद्दल जागरूकता निर्माण करणे. अनेकदा नागरिकांच्या नावावरची खाती दीर्घकाळ वापरात नसल्याने ती निष्क्रिय होतात आणि ठेवी विसरल्या जातात. या मोहिमेद्वारे नागरिकांना त्यांच्या विसरलेल्या ठेवी शोधणे आणि परत मिळवणे किती सोपे आहे हे समजावून सांगितले जाणार आहे. दुसरा भाग म्हणजे सुलभता नागरिकांना बँकांमार्फत आणि डिजिटल माध्यमांतून त्यांचे पैसे शोधण्यात आणि परत मिळवण्यात सोय व्हावी यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कृती नागरिकांनी आपल्या हक्काच्या ठेवीसाठी प्रत्यक्ष पुढाकार घ्यावा आणि त्या परत मिळवाव्यात यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व बँका या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणार असून, विविध ठिकाणी ग्राहक भेटी, जनजागृती शिबिरे आणि माहिती सत्रांचे आयोजन केले जाईल. नागरिकांनी आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशाचा हक्क राखण्यासाठी ही संधी गमावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच त्यांनी म्हटले की, कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी ठेवीदारांनी जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा किंवा ९४२०४८५५२२ या क्रमांकावर संपर्क करावा.