ठाणे – गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून मिशन मोडवर काम करावे. तसेच गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यांतील शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभागाला दिले. ठाणे जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

गणेशोत्सव दरम्यान ठिकठिकाणी मंडप, मिरवणुका, आरास तसेच भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. शहरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढते, विसर्जनाच्या मिरवणुका चालतात. अशा वेळी वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, नागरिकांना गैरसोय होऊ नये आणि आपत्कालीन सेवांना तात्काळ मार्ग मिळावा यासाठी अवजड वाहनांवर बंदी घालणे अत्यावश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती, वाहतूक नियंत्रण, पर्यायी मार्ग आखणी, अपघातांची संख्या कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

अपघातप्रवण क्षेत्रांवर तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. ब्लॅकस्पॉट आणि व्हलनरेबल स्पॉटवर संबंधित विभागांनी मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन सुरक्षा उपाय वाढवावेत. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरावेत, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होणाऱ्या लोकेशन्सवर स्वतंत्र नियोजन करावे, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

गणेश आगमन व विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी घालावी. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन करावे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवावे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी वेळेत मदत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी ड्युटी चार्ट तयार करून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले.