ठाणे जिल्हा परिषदेतील १३४३ पैकी अवघ्या ३०० शाळा डिजिटल; बहुतांश शाळांमध्ये विजेची समस्या; ११६ शाळांना वीज मीटरही नाही
एकीकडे केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी विविध प्रकल्पांची आखणी करत असताना, सरकारी शाळांमधून घडत असलेल्या भविष्यातील पिढीला मात्र अंधारयात्रेचा प्रवास घडत आहेत. प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आणि व्यवस्थापनांकडून योग्य पाठपुरावा घेतला जात नसल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या १ हजार ३७३ प्राथमिक शाळांपैकी अवघ्या ३०० शाळा आतापर्यंत डिजिटल होऊ शकल्या आहेत. बहुतांश शाळांना विजेची समस्या भेडसावत असल्याने त्यांच्या संगणकीकरणात अडचणी येत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या ११६ शाळांमध्ये अद्याप महावितरणचे वीज मीटरही बसलेले नाहीत, तर जवळपास ६२१हून अधिक शाळांचा वीजपुरवठा देयके न भरल्यामुळे खंडित करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
२० वर्षांपूर्वी शाळांमध्ये संगणक, पंखे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा पाहिजे म्हणून शिक्षण विभागाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या शाळांना महावितरणचे वीज मीटर बसविण्यात आले. वीज मीटर बसविल्यानंतर शाळांमधील विद्युत उपकरणे सुरू झाली. मात्र दर महिन्याला विजेचे देयक शाळेच्या नावाने येण्यास सुरुवात झाली. हे देयक जिल्हा परिषदेने भरण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. सुरुवातीच्या काळात शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून ही देयक भरणा केली. प्रत्येक महिन्याची वीज देयक आपण किती काळ भरणा करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला. अनेक शिक्षकांनी वीज देयक भरणा करणे थांबविले. शाळांनी जिल्हा परिषदेला कळवून थकीत वीज देयक भरण्याची मागणी केली. तरीही शिक्षण विभागाने त्याकडे कानाडोळा केला. शाळांची वीज देयकांची थकबाकी वाढत गेली. महावितरणने शाळांना नोटिसा काढून थकीत वीज देयक रकमा भरण्याचे सूचित केले. तरीही देयक भरणा न झाल्याने शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. एका जागरूक नागरिकाने दीड वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे जि. प. शाळांची समग्र माहिती मागविली होती. त्यात किती शाळा डिजिटल, किती शाळांना वीज नाही आहे, विजेची किती रक्कम थकीत आहे, असे प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची माहिती देण्यास जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाला दीड वर्षांचा कालावधी लागला. हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते याची जाणीव झाल्याने, गेल्या जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेने सेस फंडातून ६२१ जि. प. शाळांचा ४६ लाख ४२ हजार ५५१ रुपयांचा थकीत वीज भरणा महावितरणकडे केला आहे, अशी माहिती ठाणे जि. प.च्या लेखाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महावितरणकडून काही शाळांना वाणिज्य दराने, तर काही शाळांना निवासी दराने वीज देयक पाठविली जातात, असा दुजाभाव महावितरणकडून का करण्यात येतो, असे प्रश्न शिक्षक उपस्थित करीत आहेत.यासंदर्भात ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्याशी सतत संपर्क केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
* ठाणे जि. प.च्या एकूण १३७३ शाळा
* १२५७ शाळांना वीज मीटर बसविले आहेत
* ३०० शाळा डिजिटल
* भिवंडी तालुक्यात १७४ शाळा. विजेची थकबाकी १७ लाख ६५ हजार होती. टोरंटो कंपनीकडून थकीत रकमेला व्याज लावलेले नाही.
* मुरबाड तालुक्यात १७४ शाळा. ५ लाख ५१ हजारांची थकबाकी होती.
* शहापूरमध्ये १९२ शाळा. ९ लाखांची थकबाकी होती.
* अंबरनाथमध्ये १४ शाळा. १ लाख ३४ हजार थकबाकी होती.
* कल्याण ६७ शाळा. १२ लाख ४६ हजारांची थकबाकी होती.
* महावितरणकडून थकीत रकमेवर ९ लाख ८५ हजारांचे व्याज.