ठाणे : ठाणे जिल्ह्यात यंदा गणेश चतुर्थी निमित्ताने बुधवारी दीड लाखाहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये १ लाख ५६ हजार ७८२ घरगुती आणि १ हजार ६० सार्वजनिक गणेशमूर्तींचा सामावेश आहे. सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन ठाणे शहरात होणार असून सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना उल्हासनगर ते बदलापूर भागात होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मंगळवारी ठाणे पोलिसांनी अनेक ठिकाणी रुट मार्च काढला.

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात एकूण पाच परिमंडळे येतात. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या परिमंडळांचा समावेश आहे. यंदा १ लाख ५६ हजार ७८२ घरगुती आणि १ हजार ६० सार्वजनिक असे एकूण १ लाख ५७ हजार ८४२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यापैकी ठाणे, कळवा, दिवा, शिळफाटा या भागात ३२५ इतक्या सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. तर सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात झाले असून तेथे ४९ हजार ४६१ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी ठाणे वाहतुक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही ठिकठिकाणी तैनात असणार आहे. शहरात राज्य राखील दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले असून साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी मंगळवारी शहरातील विविध भागामध्ये रुट मार्च केला. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेशमूर्ती प्रतिष्ठापना

शहरे – घरगुती गणेशमूर्ती- सार्वजनिक गणेशमूर्ती

ठाणे ते दिवा- (घरगुती गणेशमूर्ती-४५,८८५)- (सार्वजनिक गणेशमूर्ती – ३२५)

भिवंडी – (घरगुती गणेशमूर्ती-१६,३२३) (सार्वजनिक गणेशमूर्ती१८३)

डोंबिवली, कल्याण – (घरगुती गणेशमूर्ती-४५,११३) – ( सार्वजनिक गणेशमूर्ती २८९)

उल्हासनगर ते बदलापूर – (घरगुती गणेशमूर्ती-४९,४६१)- (सार्वजनिक गणेशमूर्ती २६३)

एकूण – (घरगुती गणेशमूर्ती १,५६,७८२)- (सार्वजनिक गणेशमूर्ती१०६०)