बदलापूरः २०१५ वर्षात झालेल्या नगर परिषद निवडणुकांनंतर अखेर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगर प्रदेशातील अ वर्ग असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केली. केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांमध्येच निवडणुकीपूर्वी मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. जवळपास सर्वच नगर परिषदांमध्ये स्वबळावर लढणाऱ्या या तिन्ही पक्षांना एकमेकांवर चिखलफेक करताना संयम बाळगावा लागणार असून त्यासाठी त्यांचा कस लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर परिषद निवडणुकांनुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या दोन अ वर्ग नगर परिषदांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक सज्ज झाले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पालिंकावर यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र गेल्या काही वर्षात येथे भाजपनेही आपल संघटनात्मक ताकद वाढवली आहे.
अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा खासदार, आमदार आहेत. येथए एकूण ५९ सदस्यांसाठी मतदान पार पडेल. तर बदलापूर नगर परिषदेत ४९ सदस्यांसाठी निवडणूक होईल. दोन्ही शहरात द्विसदस्यीस प्रभाग आहेत. गेल्या वर्षात अंबरनाथ शहरात भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. तर शिवसेनेनेही अनेकदा शक्तिप्रदर्शन केले आहे. बदलापुरात शिवसेना आणि भाजपतील संघर्ष गेल्या काही महिन्यात तीव्र झाला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद पालिका निवडणुकीत पहायला मिळतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बदलापुरात भाजपला साथ दिली आहे. अंबरनाथ शहरात भूमिका गुलदस्त्यात आहे.
दोन्ही शहरात शिवसेनेच्या संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी जोमाने प्रचार सुरू केला आहे. बदलापुरात तर वीणा वामन म्हात्रे यांच्या नावाशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. तर अंबरनाथमध्ये अनेक नावे स्पर्धेत आहेत. भाजपातर्फे अद्याप कुठेही नाव घोषित करण्यात आलेले नाही. मात्र संभाव्य उमेदवारांनी प्रचारावर जोर दिला आहे. या दोन्ही पक्षांना प्रचारात एकमेकांवर टीका करताना संयम बाळगावा लागणारं आहे. या महायुतीतील पक्षाच्या संघर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्ष महायुतीला किती आव्हान देतात आणि किती मजल मारतात ते येत्या काळात स्पष्ट होईल.
